'त्या' अडीचशे मद्यविक्रेत्यांची नेमकी स्थिती सादर करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

सर्वोच्च न्यायालयाने विविध निकषांच्या आधारे महामार्गांवर मद्य विक्रीस बंदीचा आदेश दिला आहे. त्याची सर्वत्र अंमलबजावणी सुरू आहे. मात्र हा आदेश लागू होत नसल्याचा दावा करत धुळे, जळगावसह मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील ठिकठिकाणच्या 250 मद्यविक्रेत्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली.

धुळे - सर्वोच्च न्यायालयाने विविध निकषांच्या आधारे महामार्गांवर मद्य विक्रीस बंदीचा आदेश दिला आहे. त्याची सर्वत्र अंमलबजावणी सुरू आहे. मात्र हा आदेश लागू होत नसल्याचा दावा करत धुळे, जळगावसह मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील ठिकठिकाणच्या 250 मद्यविक्रेत्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावर या विक्रेत्यांची नेमकी स्थिती सादर करण्याचा आदेश खंडपीठाने दिला.

सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील एम. एम. नेर्लिकर, ऍड. प्रवीण पाटील, ऍड. गुजराथी, ऍड. बागूल आदी कामकाज पाहत आहेत. ऍड. नेर्लिकर यांनी सांगितले, की सर्वोच्च न्यायालयाने मद्य विक्री बंदबाबत दिलेला आदेश आम्हास लागू होत नाही, असा दावा खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील ठिकठिकाणच्या 250 मद्यविक्रेत्यांनी याचिकेद्वारे केला आहे. आमची दुकाने राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गावर येत नाहीत, असा दावा संबंधितांकडून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर खंडपीठाने मंगळवारी कामकाजानंतर त्या- त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह अन्य प्रतिवादींना नोटीस बजावत 9 जूनला सुनावणी ठेवली आहे. संबंधित याचिकाकर्त्यांची दुकाने राष्ट्रीय, राज्य महामार्गावर येतात किंवा नाहीत, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासह निर्देशात संबंधित याचिकाकर्त्यांची दुकाने समाविष्ट होतात किंवा नाही, याची तपासणी करून नेमकी स्थिती सादर करावी, असा आदेश खंडपीठाने संबंधित क्षेत्रातील जिल्हाधिकारी आणि अन्य प्रतिवादी अधिकाऱ्यांना दिला आहे.