काश्‍मिरमधील अशांततेमुळे अनंतनागमधील पोटनिवडणूक रद्द

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

जम्मू आणि काश्‍मीरमधील अशांत परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने अनंतनाग येथे 25 मे रोजी होणाऱ्या पोटनिवडणूका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) - जम्मू आणि काश्‍मीरमधील अशांत परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने अनंतनाग येथे 25 मे रोजी होणारी पोटनिवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

"राज्यातील वर्तमान परिस्थिती आणि सुरक्षेच्या पुरेशा बंदोबस्ताच्या अभावामुळे 25 मे रोजी होणारी निवडणूक शांततापूर्ण, मुक्त आणि पारदर्शक पद्धतीने घेता येणार नाही', असे सांगत निवडणूक आयोगाने अनंतनाग येथील निवडणूक रद्द केली आहे. काही राजकीय पक्षांचेही निवडणूक रद्द करण्याचे मत असल्याचेही आयोगाने म्हटले आहे. यापूर्वी 12 एप्रिल रोजी अनंतनाग येथे पोटनिवडणूक होणार होती. मात्र अशांत परिस्थितीमुळे तेव्हाही निवडणूक रद्द करावी लागली होती. दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यासाठी जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल एनएन व्होरा आज (मंगळवार) केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेणार आहेत.

श्रीनगर येथील मतदारसंघात 9 एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली होती. यावेळी मोठी हिंसा झाली. त्यामध्ये सात नागरिकांचा मृत्यू तर अन्य काही जण जखमी झाले.