विजय मल्ल्याला हजर करण्याची शाश्‍वती द्या- न्यायालय

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

न्यायालयाच्या अवमानप्रकरणी जास्तीत जास्त सहा महिणे कारावास किंवा दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे.

नवी दिल्ली : विजय मल्ल्या मल्ल्या याला 10 जुलैला शिक्षा सुनावण्याआधी त्याला ब्रिटनमधून भारतात सुरक्षितपणे आणण्याची शाश्‍वती द्यावी, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिल्या. मल्याला न्यायालयाचा अवमानप्रकरणी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

मल्ल्याने संपत्तीची माहिती न्यायालयाला दिली नाही, तसेच कोणताही व्यवहार परस्पर न करण्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाचे आदेश असताना ब्रिटीश कंपनी दिएगोकडून 40 दशलक्ष डॉलर परस्पर मुलांना हस्तांतरीत केले. या कारणास्तव मल्ल्याने न्यायालयाचा अवमान केला असून त्याला न्यायालयाने दोषी मानले असून 10 जुलै शिक्षा सुनावली जाणार आहे.

मल्ल्याला सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला सूचना दिल्या असून मल्ल्याच्या सुनावणीची एक प्रतही मंत्रालयाला पाठविण्यात आली आहे, असे सर्वोच्च न्यायलयाने सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. आदर्श कुमार गोएल आणि उदय उमेश यांच्या खंडपीठाने या सूचना गृहमंत्रालयाला दिल्या आहेत. न्यायालयाच्या अवमानप्रकरणी जास्तीत जास्त सहा महिणे कारावास किंवा दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली बॅंक संघटनांनी मल्ल्याच्या कर्जबुडवेगिरी प्रकरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.