मोफत वायफाय, महिलांसाठी पिंक टॉयलेट्‌स; भाजपच्या संकल्प पत्रामध्ये आश्‍वासनांची खैरात 

पीटीआय
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

कोणालाही सापत्न वागणूक न देता पारदर्शक पद्धतीने आम्ही सेवा पुरवू, असे आदित्यनाथ या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. राज्यात लवकरच 652 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक होणार असून, यामध्ये सोळा महापालिकांचा समावेश आहे. राज्यामध्ये प्रथमच स्थापन करण्यात आलेल्या अयोध्या, मथुरा आणि वृंदावन महापालिका यंदा निवडणुकीस समोरे जात आहेत. 

लखनौ(पीटीआय) : सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय सेवा, महिलांसाठी पिंक टॉयलेट्‌स आणि सर्व घरांना मोफत पाणीपुरवठा करण्याची आश्‍वासने भाजपने आपल्या संकल्प पत्रामध्ये दिली आहेत. उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यामध्ये आश्‍वासनांची खैरातच करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश वर्मा, नगर विकासमंत्री सुरेश खन्ना आणि उत्तर प्रदेश भाजपचे प्रमुख महेंद्रनाथ पांडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप मुख्यालयामध्ये या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. 

कोणालाही सापत्न वागणूक न देता पारदर्शक पद्धतीने आम्ही सेवा पुरवू, असे आदित्यनाथ या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. राज्यात लवकरच 652 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक होणार असून, यामध्ये सोळा महापालिकांचा समावेश आहे. राज्यामध्ये प्रथमच स्थापन करण्यात आलेल्या अयोध्या, मथुरा आणि वृंदावन महापालिका यंदा निवडणुकीस समोरे जात आहेत. 

अन्य आश्‍वासने 
भाजपच्या संकल्प पत्रामध्ये 28 आश्‍वासनांचा समावेश आहे. लोकांना पेयजल सुविधा देणे, पथदिव्यांच्या व्यवस्थेत सुधारणा, मोफत शौचालय सुविधा, महिलांसाठी पिंक टॉयलेट्‌स, वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी 20 हजार रुपयांचे अनुदान, भटक्‍या प्राण्यांसाठी निवाऱ्याची सोय आदी आश्‍वासने भाजपने दिली आहेत.