मतदान यंत्रांचा वाद राष्ट्रपतींच्या दरबारी

EVM row: Oppn to knock President's door
EVM row: Oppn to knock President's door

नवी दिल्ली - इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) कथित गैरवापराचा मुद्दा विरोधकांनी थेट राष्ट्रपतींच्या दरबारात नेला आहे. कॉंग्रेससह 13 विरोधी पक्षांनी "ईव्हीएम'बद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे तक्रार केली. तसेच, सरकारची कथित दडपशाही, सीबीआय, "ईडी'सारख्या यंत्रणांचा राजकीय विरोधकांविरुद्ध होणारा गैरवापर पाहता राष्ट्रपतींनी भारताच्या घटनेचे संरक्षण करावे, असे आवाहनही विरोधकांनी केले. 

कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे, माकप सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा, बहुजन समाज पक्षाचे नेते सतीश मिश्रा, जेडीयू नेते शरद यादव, समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव, नीरज शेखर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तारिक अन्वर, तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक आदी 13 पक्षांच्या नेत्यांनी मुखर्जी यांची भेट घेऊन तक्रारीचे निवेदन सादर केले. 

"ईव्हीएम'बद्दल सातत्याने तक्रारी येत असून, या मुद्द्यावर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला भेटून आपली चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी आयोगाने या तक्रारींची दखल घेण्याचे आवाहन विरोधकांनी केले असून, यावर आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे मान्य केले आहे, याकडे राष्ट्रपतींचे लक्ष वेधल्याचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

देशातील लोकशाही धोक्‍यात आली असून दडपशाहीचे वातावरण आहे. बहुतांश महत्त्वाच्या पदांवर घटनात्मक संकेत डावलून नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून संसदेला डावलण्याचा, साध्याशा विधेयकांचे वित्तीय विधेयकांत रूपांतर करून राज्यसभेला गैरलागू ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. बिगर भाजपशासित राज्यांमधील सरकारे अस्थिर करणे; मुख्यमंत्र्यांवर, माजी मुख्यमंत्र्यांवर खटले भरणे, विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सक्तवसुली संचालनालय (ईडी), सीबीआय, प्राप्तिकर खाते यासारख्या संस्थांचा गैरवापर करणे, देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असून सत्ताधारी पक्षांशी संबंधित घटनांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न, सांस्कृतिक संस्था, नालंदा विद्यापीठ, नेहरू मेमोरियल ग्रंथालयसारख्या संस्थांनाही दुबळे बनविणे असे सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची तक्रार विरोधकांनी निवेदनाद्वारे केली. 

मोईलींचे वक्तव्य व्यक्तिगत 
"आप', बहुजन समाज पक्षासोबतच कॉंग्रेसकडूनही सातत्याने "ईव्हीएम'बद्दल आक्षेप घेतला जात असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी "ईव्हीएम'वरील टीका पक्षाची निराशावादी मानसिकता दर्शविणारी आहे, आपल्या पराभवाचे खापर "ईव्हीएम'वर फोडू नये, असा घरचा आहेर कॉंग्रेसला दिला होता. मात्र, त्यांनी व्यक्त केलेले मत ही कॉंग्रेसची अधिकृत भूमिका नव्हे, तर त्यांचे ते व्यक्तिगत मत आहे, अशी सारवासारव गुलाम नबी आझाद यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com