'प्रशांत किशोर यांना शोधा, 5 लाख मिळवा'

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मार्च 2017

प्रशांत किशोर यांच्याविरोधात थेट अशी पोस्टरबाजी केल्याने राजेशसिंह यांना काँग्रेसने सहा वर्षांसाठी निलंबित केले.

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवाचे स्पष्टीकरण देण्यासाठी काँग्रेस कारणमीमांसा करीत असतानाच कार्यकर्त्यांनी एक नाव पुढे केले आहे. काँग्रेसची रणनीती ठरविणारे प्रशांत किशोर यांच्याकडे काँग्रेस नेते बोट दाखवत आहेत.

'प्रशांत किशोर यांना शोधा, आणि 5 लाख रुपये बक्षीस मिळवा' असा जाहीर फलक लखनौ येथील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाजवळ लावण्यात आला होता. तो फलक नंतर काढून टाकण्यात आला. फलक लावणाऱ्यांची ओळखही उघड करण्यात आली. त्या फलकावर बक्षिसाच्या घोषणेच्या बाजूलाच राजेशसिंह यांचा फोटो होता. राजेशसिंह हे 20 वर्षांपासून काँग्रेसचे कार्यकर्ते असून, चारवेळा त्यांनी उत्तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. 

प्रशांत किशोर यांच्याविरोधात थेट अशी पोस्टरबाजी केल्याने राजेशसिंह यांना काँग्रेसने सहा वर्षांसाठी निलंबित केले. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी राज बब्बर यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली सात नवनिर्वाचित आमदारांसोबत झालेल्या बैठकीत या पोस्टरबद्दल राजेशसिंह यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

काँग्रेसमधील प्रमुख गांधी घराण्याचे होम ग्राऊंड व सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा पराभव आहे. 

"मी जे केले त्यावर मी ठाम आहे. प्रशांत किशोर यांनी आम्हाला गृहीत धरले. आम्ही पक्षासाठी घाम गाळणारे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत. तथापि, आमची मते निवडणुकीत पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आली. झटपट पैसे कमावणाऱ्या सल्लागारांना घेतल्याचा परिणाम म्हणजे हा पराभव आहे," असे राजेशसिंह यांनी सांगतिले. 
 

Web Title: find prashant kishor, get 5 lac, claims a congress poster