द्रमुकच्या लोकप्रतिनिधींविरुद्ध FIR

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

तमिळनाडूचे मुख्यमंत्री इडाप्पडी के. पलानीस्वामी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह शनिवारी राजभवन येथे जाऊन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली.

चेन्नई : मरीना बीचवर निदर्शने केल्याप्रकरणी द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, त्यांच्या पक्षाचे आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांविरुद्ध रविवारी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविण्यात आला. दरम्यान, द्रमुकने तमिळनाडूच्या सर्व जिल्ह्यांतील पक्ष कार्यालयांत 22 फेब्रुवारीला उपोषण करण्याची घोषणा केली आहे.

विधानसभेत शनिवारी झालेल्या विश्‍वासदर्शक ठरावादरम्यान स्वत:सह आपल्या आमदारांवर झालेल्या कथित हल्ल्याविरोधात स्टॅलिन मरीना बीचवर निदर्शने करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेत कायद्याचा, तसेच सार्वजनिक व्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी स्टॅलिन आणि त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींविरुद्ध एफआयआर नोंद करण्यात आली आहे. द्रमुकने कायद्यानुसार आवश्‍यक पूर्वपरवानगी न घेता निदर्शने केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. स्टॅलिन यांच्याशिवाय निदर्शनात सहभागी 63 आमदार, तीन खासदार आणि द्रमुकच्या अनेक कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आली आहे.

दरम्यान, द्रमुकने विधानसभेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत शशिकला गटाचे पलानीस्वामी यांनी जिंकलेला विश्‍वासदर्शक ठराव रद्दबातल करण्याची मागणी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली. त्याचप्रमाणे विश्‍वासदर्शक ठरावादरम्यान द्रमुकच्या आमदारांना ज्या पद्धतीने सभागृहाबाहेर काढण्यात आले, ती लोकशाहीची हत्या असल्याचे सांगत 22 फेब्रुवारीला राज्यभरात उपोषणे करण्याची घोषणा केली.

पलानीस्वामी-राज्यपाल भेट
तमिळनाडूचे मुख्यमंत्री इडाप्पडी के. पलानीस्वामी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह शनिवारी राजभवन येथे जाऊन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. ही राजशिष्टाचाराला अनुसरून भेट असल्याचे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. पलानीस्वामी यांनी राज्यपालांशी काहीवेळ चर्चा केल्याचेही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, पलानीस्वामी उद्या (सोमवारी) अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची मध्यवर्ती कारागृहात जाऊन भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: fir against dmk leaders