भारतीय गोळीबारात पाकचे तीन सैनिक ठार

पीटीआय
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

ताबारेषेजवळ तणाव कायम; बीएसएफचे दोन जवान जखमी
श्रीनगर - पाकिस्तानी सैनिकांनी काल एका भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याने लष्कराने पाकिस्तानविरुद्ध जोरदार आघाडी उघडली आहे. भारतीय लष्कराने आज पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत तीन पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आहे. मृत सैनिकांत कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. पाकिस्तानच्या या तीन सैनिकांना काश्‍मीरच्या माछील सेक्‍टरमध्ये मारल्याचे लष्कराने म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले आहेत.

भारतीय लष्कराने कालपासून प्रत्यक्ष ताबारेषेवर जोरदार गोळीबार सुरू केला आहे. 2003 नंतर प्रथमच ही मोठी कारवाई मानली जात आहे.

पाकिस्तानकडून ज्या चौकीतून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी मार्ग करून दिला जातो, त्याच ठिकाणांवर भारतीय लष्कर गोळीबार करत आहे. या गोळीबारात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानने काल याच भागात भारतीय लष्करावर हल्ला केला होता. त्यात तीन जवान जखमी झाले होते. तसेच, पाकिस्तानी सैनिकांनी एका भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली होती. त्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचा इशारा दिला होता. पाकिस्तानने आज पुन्हा तीन ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, त्यामुळे पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताने चोख उत्तर दिले, त्यात पाकिस्तानचे तीन सैनिक मारले गेले. संरक्षण विभागाचे प्रवक्ते मनीष मेहता म्हणाले, की भारतीय लष्कराची ठाणी ही पाकिस्तानला जोरदार उत्तर देत आहेत. पाकिस्तानी सैनिकांनी भीमबर गली सेक्‍टर, कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्‍टरमध्ये गोळीबार केला. पाकिस्तानकडून अजूनही गोळीबार सुरू असून, केरान क्षेत्रात झालेल्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले आहेत.

पाकिस्तानी प्रवक्‍त्याचा दुजोरा
पाकिस्तान सैनिकांच्या मीडिया विंग इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) यांनी देखील तीन पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे. आयएसपीआरच्या निवेदनात म्हटले, की प्रत्यक्ष ताबारेषेजवळ भारताकडून झालेल्या गोळीबाराला उत्तर देताना पाकिस्तानचे तीन सैनिक मारले गेले. त्यांची ओळख पटली असून कॅप्टन तैमूर अली खान, हवालदार मुश्‍ताक हुसेन आणि लान्स नायक गुलाम हुसेन अशी त्यांची नावे आहेत.

अकरा जण मारल्याचा दावा
दरम्यान, पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर भागात भारताकडून झालेल्या गोळीबारात एक प्रवासी बस सापडून त्यातील अकरा जण ठार, तर अनेक जण जखमी झाल्याचा दावा आयएसपीआरने केला आहे. ही घटना नीलम व्हॅलीत धुंडीनिआल येथे घडल्याचे निवेदनात म्हटले आहे. एका भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचे वृत्त बिनबुडाचे असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

Web Title: firing in india-pakistan border