महिलांच्या वेषात हल्लेखोरांचा गोळीबार

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

रोहतक- हरियानातील रोहतक जिल्हा न्यायालयाच्या आवारात महिलांच्या वेषात आलेल्या हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या केलेल्या गोळीबारात कुख्यात गॅगस्टर रमेश लोहार याचा साथीदार ठार झाला. या गोळीबारात लोहार व त्याच्या वकिलासह पाच जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, गुंड लोहार हा त्याचे वकील व अन्य पाच जणांसह खटल्याच्या सुनावणीला आला होता. त्या वेळी सलवार कमीज अशा महिलांच्या वेषात आलेल्या दोघांनी न्यायालयाबाहेरच लोहारवर गोळीबार केला. पंधरा राउंड झाडून हल्लेखोर तत्काळ मोटारसायकलवरून पळून गेले. या गोळीबारातून लोहार बचावला; पण त्याच्या पायात गोळ्या घुसल्या आहेत. मात्र, त्याचा सहकारी संजीत या हल्ल्यात ठार झाला.''

जखमींना रोहतकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. लोहार व त्याचा प्रतिस्पर्धी गॅगस्टर काला यांच्या टोळीत वाद होता. या टोळ्यांतील संघर्षामुळे ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी व्यापक मोहीम उघडली आहे.