'त्या' मुलीवर अजूनही गायत्री प्रजापतींची दहशत!

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

प्रजापती व त्यांच्या सहाकाऱ्यांना तुरुंगात गेल्याचे मला पाहायचे आहे. त्यांनी आमचे जीवन कायमचे उद्‌ध्वस्त केले आहे. आमचा जीव वाचविण्यासाठी आम्ही आमचे राहते घर, गाव सोडले. या वर्षी मी दहावीची परीक्षा देऊ शकले नाही.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अत्याचाराला बळी पडलेली सोळा वर्षांची मुलगी आजही भीतीच्या सावटातून बाहेर आलेली नाही. आजही ती रात्री शांतपणे झोपू शकत नाही. मध्यरात्रीच भीतीने दचकून उठते. 

या मुलीचा विनयभंग करीत तिच्या आईवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रजापती यांच्यावर आरोप आहे. सध्या ही मुलगी येथील 'एम्स' रुग्णालयात डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली राहत आहे. कोणालाही तिला भेटण्यास मज्जाव आहे. आजही ही मुलगी रात्री शांतपणे झोपू शकत नाही. रात्री-अपरात्री मध्येच दचकून उठते व तिच्या वॉर्डमधून पळून जाण्याचा प्रयत्न करते. प्रजापतींचे लोक तिला रात्री शोधत येतील, अशी भीती तिला सतावते. प्रजापती यांना आता या प्रकरणात शिक्षा व्हावी आणि आईला न्याय मिळावा, अशी तिची प्रामाणिक इच्छा आहे. प्रजापती यांना आता कारागृहात पाहण्याची तिची मनोमन इच्छा आहे. 

वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ''प्रजापती व त्यांच्या सहाकाऱ्यांना तुरुंगात गेल्याचे मला पाहायचे आहे. त्यांनी आमचे जीवन कायमचे उद्‌ध्वस्त केले आहे. आमचा जीव वाचविण्यासाठी आम्ही आमचे राहते घर, गाव सोडले. या वर्षी मी दहावीची परीक्षा देऊ शकले नाही. मात्र, पुढच्या वर्षी ही परीक्षा देण्याची माझी इच्छा आहे.'' ही मुलगी सतत भीतीच्या छायेत असते, ती रात्री साधी झोपूही शकत नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

या प्रकरणी प्रजापती यांच्याविरुद्ध 'एफआयआर' दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 18 फेब्रुवारीला दिले आहेत. समाजवादी पक्षाचे बडे प्रस्थ असलेले प्रजापती सध्या अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत.

Web Title: Gayatri Prajapati Uttar Pradesh Prajapati gangrape