जीडीपीची आकडेवारी संशयास्पद

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्री जनतेची दिशाभूल करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर केंद्र सरकारकडून एकूण देशांतर्गत उत्पन्नाची (जीडीपी) आकडेवारी आश्‍चर्यकारक आणि संशयास्पद असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

जीडीपीची आकडेवारी संशयास्पदरीत्या सादर केल्याने देशाच्या जागतिक विश्‍वासार्हतेला तडा जाण्याची शक्‍यता आहे, असे कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी सांगितले. केंद्रीय सांख्यिकी विभागाकडून नुकतीच नोटाबंदीनंतर 7.1 टक्के जीडीपी असल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यावर टीका करताना शर्मा म्हणाले, की नोटाबंदीचे देशात प्रतिकूल परिणाम पाहायला मिळाले, अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे केंद्र सरकारतर्फे दाखविल्या जाणाऱ्या आकडेवारीवर अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्र्यांवर टीका करताना शर्मा म्हणाले, की मोदी व जेटली हे त्यांच्या संकुचित राजकारणातून अल्पकालीन फायदा पाहात आहेत. मात्र ते समस्येच्या मुळाशी जाण्यास तयार नाहीत. चुकीची आकडेवारी दाखविल्यामुळे पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्री दोषी असून ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. पंतप्रधानांच्या निष्काळजीपणाच्या निर्णयामुळे देशातील गरीब जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कामगारांचे वेतन, रोजगारावर उदरनिर्वाह करणारे मोलमजूर यांच्या यातनांकडे दुर्लक्ष करत आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचेही शर्मा यांनी या वेळी सांगितले.

Web Title: GDP figures suspected