आमचे हात एकदाच मोकळे करा: भारतीय लष्कर

वृत्तसंस्था
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यामधील उरी येथे दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यामध्ये 17 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारतीय लष्कराचा पाकिस्तानविषयीचा संताप अनावर झाला आहे. पाकिस्तानला थेट संदेश देण्यासाठी सीमेपलीकडे "मर्यादित परंतु प्रभावी‘ हल्ला करण्याच्या योजनेचा सरकारने विचार करावा, असा लष्करामधील एका गटाचा आग्रह आहे. 

या नव्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील प्रत्यक्ष ताबारेषेवरील (एलओसी) सुरक्षा अधिक कडेकोट करण्यासाठीही नव्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. मात्र एलओसीची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याबरोबरच पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण शिबिरांवर थेट हल्ला करण्यासंदर्भातील प्रस्तावाचाही विचार सरकारला करावा लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर, एलओसीवर तैनात असलेल्या लष्कराच्या तुकड्या आणि हवाई दलास अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सीमेपलीकडे हल्ला करण्यात आल्यास पाकिस्तानी सैन्याकडून प्रतिकार करण्यात येईल; मात्र त्यास प्रभावी उत्तर देता येईल, असा विश्‍वास भारतीय लष्कराने व्यक्त केला आहे. पाकिस्तानला आता "पुरे झाले,‘ असा थेट संदेश देण्याची वेळ आली असल्याची भावना लष्कराकडून व्यक्‍त करण्यात आली आहे. 

""26/11 ते पठाणकोट असे कितीतरी दहशतवादी हल्ले भारतात घडविण्यात येत असताना आपण काहीच करायचे नाही का? सध्याच्या आपल्या संरक्षणविषयक धोरणामुळे पाकिस्तानी सैन्य व आयएसआयचेच बळ वाढत आहे,‘‘ अशी संप्तप्त भावना एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने व्यक्‍त केली आहे.