देशात नवीन फाळणी करण्याचा प्रयत्न - गोपाळकृष्ण गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

फाळणी आता झाली असली तरी मानसिक विभागणीवर आधारित नव्या फाळणीचे विचार सुरू आहेत आणि असे जातीयवादाचे प्रक्षेपणास्त्र थांबविणे महत्त्वाचे आहे

नवी दिल्ली - श्रद्धा, विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रत्यक्ष व अत्यप्रत्यक्षपणे हल्ला चढविला जात असून मानसिक पातळीवर नवीन फाळणी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याची टीका उपराष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांनी गुरुवारी केली.

उपराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात जनतेला उद्देशून गांधी यांनी पत्र लिहिले आहे. फाळणी आता झाली असली तरी मानसिक विभागणीवर आधारित नव्या फाळणीचे विचार सुरू आहेत आणि असे जातीयवादाचे प्रक्षेपणास्त्र थांबविणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. "लोकशाहीतील श्रद्धा, विचार आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हल्ले होत आहेत. नागरी सेवा देणाऱ्या संस्थावरील दबाव स्पष्टपणे जाणवत आहे. अशा यंत्रणामध्ये जेथे मतभेद उघड होत असतात, तेव्हा नियमानुसार वागणे त्यांना भाग पाडले जाते. तेथे बोलण्याचा प्रयत्न केला की त्यांना शांत केले जाते. परस्पर विश्‍वासाचा संबंध जेथे येतो तेथे असहिष्णुता, धर्मांधमतेचे प्रमाण सर्वाधिक असते,'' असे ते म्हणाले.

गांधी म्हणाले की, "अजून सहा महिन्यांनी आपण महात्मा गांधी यांच्या हत्येचा व वेदनादायी फाळणीचे 70 वे स्मृतीवर्षाचे आयोजन करणार आहोत. फाळणी, 1946-47मधील दंगलीचे वास्तव आता भूतकाळात जमा झाले आहे. तरीही मानसिकतेमधील विभागणीवर आधारित नव्या फाळणीचे निर्मिती आमच्या मनात होत आहे''.

टॅग्स