राहुल यांची तुलना युवराजांशी, तर योगींना ठरविले यमराज

वृत्तसंस्था
रविवार, 20 ऑगस्ट 2017

भाजप- काँग्रेसमध्ये भडकले वाक्‌युद्ध

गोरखपूर: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोरखपूरला भेट दिली. येथील रुग्णालयामध्ये ऑक्‍सिजनअभावी मरण पावलेल्या बालकांच्या पालकांची भेट घेत त्यांचे दु:ख त्यांनी जाणून घेतले. राहुल यांच्या गोरखपूर दौऱ्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय वाक्‌युद्ध भडकले आहे. राहुल यांना लक्ष्य करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीमध्ये बसलेले युवराज गोरखपूरला "पिकनिक स्पॉट' बनवू शकत नाहीत, असे विधान केल्यानंतर काँग्रेस नेते संतापले आहेत. काँग्रेसनेही आदित्यनाथ यांच्यावर हल्ला चढवत त्यांची तुलना "यमराजा'शी केली आहे.

आता या वादामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही उडी घेत आदित्यनाथ यांना लक्ष्य केले. पोकळ आश्‍वासने, वक्तव्ये करून सरकार कधीपर्यंत जनतेला भुलवत राहणार आहे? स्वस्थ आणि स्वच्छ उत्तर प्रदेश यातून साकार होईल का? असा सवाल अखिलेश यांनी ट्‌विटरवरून राज्य सरकारला केला. गोरखपूरमधील रुग्णालयात 71 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर जागे झालेल्या योगी आदित्यनाथ यांनी "आंदियारी बाग' परिसरातून स्वच्छता मोहिमेला सुरवात केली. येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी अखिलेश आणि राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडले. लखनौमध्ये बसलेले शेहजादे आणि दिल्लीतील युवराजांना स्वच्छता मोहिमेचे महत्त्व पटणार नाही. ते येथे फक्त पिकनिकसाठी येतील. यासाठी आम्ही त्यांना परवानगी देऊ शकत नाही, असेही आदित्यनाथ यांनी नमूद केले.

काँग्रेस आक्रमक
आदित्यनाथ यांच्या टीकेनंतर आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनीही त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. मृत बालकांचे कुटुंबीय आदित्यनाथ यांना "यमराज' ठरवत आहेत, असा प्रहार त्यांनी केला. बालकांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री विषयांतर करत दोषींवर कारवाई करणे टाळत आहेत. मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्यांना असे वक्तव्य करणे शोभत नाही. राहुल गांधी येथे गरिबांचे दुःख जाणून घेण्यासाठी आले होते, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी सांगितले.

मदतीचे आश्‍वासन
राहुल गांधी यांनी आज विविध खेड्यांमधील मृत बालकांच्या नातेवाइकांची भेट घेत त्यांचे दुःख जाणून घेतले. त्यांनी या वेळी पीडितांना पूर्ण मदतीचे आश्‍वासन दिले; तसेच जीवघेण्या आजारांबाबत संबंधित यंत्रणेला कारवाई करण्यासाठी भाग पाडू असेही सांगितले. आज राहुल यांच्यासोबत आलेल्या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद, आरपीएन सिंह आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांचा समावेश होता.