अय्यर यांचे पाक कनेक्‍शनही सांगा: मोदी

अय्यर यांचे पाक कनेक्‍शनही सांगा: मोदी

भाभर (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याने चर्चेत आलेले काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी टीकेचे धनी ठरले. खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच जाहीरसभेत त्यांच्यावर कठोर शाब्दिक प्रहार केल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. मोदी यांनी आज कलोल, अहमदाबादेतील वातवा आणि सबरकांठा येथील हिंमतनगरमध्ये प्रचारसभा घेत पुन्हा राजकीय वातावरण ढवळून काढले. इतके दिवस केवळ विरोधकांवर टीका करणाऱ्या गुजरात भाजपनेही आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

येथे सभेत बोलताना मोदी म्हणाले, ""अय्यर हे माझ्या बाबतीत काय म्हणाले, हे तुम्ही ऐकलेच असेल. मी शिवीची गोष्ट करत नाही; कारण शिव्या ऐकून घेण्याची मला सवयच झाली आहे. मी पंतप्रधान झालो तेव्हा हे महोदय पाकिस्तानात गेले होते. तेथे ते पाकिस्तानी लोकांसोबत आयोजित बैठकीतही सहभागी झाले होते. सोशल मीडियामध्ये अय्यर यांच्या पाकिस्तान दौऱ्याचा पूर्ण हिशेब सापडेल. तेथील लोकांशी चर्चा करताना अय्यर म्हणाले होते, की मोदींना रस्त्यातून हटविल्याशिवाय भारत-पाकिस्तान संबंध कधीच सुधारू शकत नाहीत. आता मोदींना रस्त्यातून हटविण्यासाठी या मंडळींना पाकिस्तानची मदत घ्यावी लागत आहे. काँग्रेसने अय्यर यांचे पाकिस्तान कनेक्‍शन लोकांना सांगावे. मला रस्त्यातून हटविण्याचा अर्थ काय होतो.''

मनसुखभाईंचा उल्लेख
राजकोटमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना रोखत त्यांना "यूपीए' सरकारच्या काळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी प्रश्‍न विचारणाऱ्या मनसुखभाई या वृद्धाचाही उल्लेख मोदींनी या वेळी केला. मनसुखभाई यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना डॉ. सिंग यांना उत्तर देता आले नाही, असे मोदी म्हणाले. विशेष म्हणजे या वेळी मनसुखभाई यांनी डॉ. सिंग यांना "यूपीए'च्या गैरव्यवहारांची यादी असणारी वहीच सादर केली होती; पण सिंग यांनी त्यांच्याशी बोलणे टाळले होते.

पक्ष देईल ती शिक्षा मान्य : अय्यर
पंतप्रधान मोदी यांना "नीच माणूस' असे संबोधल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी या वक्तव्यामुळे पक्षाच्या झालेल्या हानीबद्दल पुन्हा एकदा माफी मागिली आहे. माझ्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाचे नुकसान झाले असेल, तर मी खूप दु:खी आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचा माझा कोणताही इरादा नव्हता. पक्ष देईल ती शिक्षा मला मान्य असेल, असेही अय्यर यांनी आज स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com