भारत आता कमकुवत नाही: राजनाथसिंह

rajnathsingh
rajnathsingh

लष्कराला पूर्ण मोकळीक; काँग्रेसवर टीका

बारडोली, (गुजरात): देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या वेळी काश्‍मीरचा मुद्दा सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे सोपविला असता, तर आज ही समस्याच बाकी राहिली नसती. इतकेच नव्हे तर पाकव्याप्त काश्‍मीरचाही भारतात समावेश झाला असता, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले. भारत आता पहिल्यासारखा कमजोर राहिला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

"गुजरात गौरव यात्रा'अंतर्गत आयोजित एका रॅलीप्रसंगी ते बोलत होते. राजनाथसिंह म्हणाले, ""आगामी काळात काश्‍मीरचा प्रश्न निश्‍चितपणे सोडविला जाईल आणि ते करण्यापासून भारताला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. त्यामुळे पाकने काश्‍मीरची चिंता करण्याची गरज नाही. देशात आता काँग्रेससारखे कमजोर सरकार नाही. ही बाबही पाकिस्ताने लक्षात घेऊन सीमेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन, दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी पाठबळ देणे असले प्रकार थांबवावेत. कारण हे जास्त दिवस चालणार नाही.''

सरदार पटेल यांनी ज्याप्रमाणे हैदराबाद व जुनागडचे संस्थान भारतात विलीन करून घेतले, त्याचप्रमाणे त्यांच्याकडे काश्‍मीरचीही जबाबदारी द्यायला हवी होती. तसे झाले असते, तर आज ही समस्याच उभी राहिली नसती; मात्र नेहरूंनी ही संधी दिली नाही, असेही राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.

आता लष्कराला मोकळीक...
तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात लष्कर, तसेच सुरक्षा यंत्रणेचे हात बांधलेले होते. ते आता खोलण्यात आले असून, पाकिस्तानच्या कुरापती व दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी त्यांना पूर्णपणे मोकळीक देण्यात आल्याचे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. सीमेवर कोणत्याही अनुचित प्रकाराला प्रत्युत्तर देताना गोळ्यांचा हिशेब ठेवू नका, अशा सूचना लष्कराला करण्यात आल्या आहेत, असेही राजनाथसिंह म्हणाले.

नावात पाक; कृती मात्र नापाक
पाकिस्तानच्या नावात 'पाक' असले तरी त्यांच्या कृती मात्र नापाक असून, ते दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी पाठबळ देतात. यामुळे लष्कराला मोकळीत देण्यात आली असून, आतापर्यंत कधी नव्हे इतके दहशतवादी मारले जाणे, हे त्याचेच द्योतक आहे. मोदी सरकारच्या काळात भारत पहिल्यासारखा कमजोर राहिला नाही, हे डोकलाम वादावरून स्पष्ट झाले, असेही राजनाथसिंह म्हणाले.


राहुल यांना विकास दिसत नाही
जगभरात कौतुकास पात्र ठरलेला गुजरातचा विकास काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिसत नाही. ते राजकीय सूडबुद्धीमुळे भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असल्याची टीका राजनाथसिंह यांनी केली. तत्कालीन काँग्रेस सरकारमधील अनेक नेते सध्या तुरुंगाची हवा खात आहेत, तर मोदी सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. आम्हाला सत्ता जाण्याची भीती नसून, देशहिताला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे स्पष्ट करतानाच सामान्यतः जनता 5-10 वर्षांत सरकार बदलते; मात्र गुजरातमध्ये भाजप 22 वर्षे सत्तेत आहे, असेही राजनाथसिंह यांनी निदर्शनास आणून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com