भाजपमध्ये जाण्याबाबत कामत यांच्याकडून इन्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

कामत यांनी आज पुन्हा एक संक्षिप्त पत्र सोनिया गांधी यांना लिहून त्यांना राजस्थानचे प्रभारी सरचिटणीस या जबाबदारीतूनही तत्काळ मुक्त करण्यात यावे अशी विनंती केली आहे.

नवी दिल्ली - भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांचे कॉंग्रेस नेते गुरदास कामत यांनी एका निवेदनाद्वारे खंडन केले आहे. आपल्याला पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावे, अशी विनंती आपणच कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केली होती आणि केवळ त्याआधारे या काल्पनिक बातम्या उठविल्या जात असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. 

कामत यांनी आज पुन्हा एक संक्षिप्त पत्र सोनिया गांधी यांना लिहून त्यांना राजस्थानचे प्रभारी सरचिटणीस या जबाबदारीतूनही तत्काळ मुक्त करण्यात यावे अशी विनंती केली आहे.

काल कॉंग्रेस महासमितीच्या प्रवक्‍त्यांनी कामत यांच्याकडे अद्याप राजस्थानची जबाबदारी असल्याचे निवेदन केले होते. त्याचा उल्लेख करुन कामत यांनी "या कामात आता आपल्याला रस नाही आणि म्हणूनच राजस्थानसह पक्षाच्या अन्य जबाबदाऱ्यांमधूनही मुक्त करावे,' असे म्हटले आहे. या पुढेही आपण मुंबई आणि महाराष्ट्राची सेवा करीत राहू असेही त्यांनी नमूद केले आहे.