आसाममध्ये दुर्गामातेची 101 फूट उंच मूर्ती

पीटीआय
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नवरात्रोत्सवाच्या आधी या मूर्तीचे 70 टक्के काम पूर्ण झाले तेव्हा 17 सप्टेंबर रोजी आलेल्या वादळात ती पूर्ण उद्‌ध्वस्त झाली होती. त्यानंतर नव्याने सुरवात करूनही एका आठवड्यात मूर्तीचे काम पूर्ण करण्यात अहमद यांना यश आले

गुवाहाटी -  नवरात्रोत्सवानिमित्त येथील एका मंडळाने बांबूपासून तयार केलेली दुर्गामातेची 100 फुटापेक्षा जास्त उंचीची मूर्ती नागरिकांचे आकर्षण ठरली आहे. ही बांबूची सर्वांत उंच मूर्ती असून गिनिज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नोंद घेतली जाईल, असा दावा मंडळाने केला आहे.

"विष्णूपूर सर्बाजानीन पूजा समिती'ने दुर्गामातेची 101 फूट उंच मूर्ती उभारली आहे. आसामधील प्रसिद्ध कलाकार व सजावटकार नुरुद्दीन अहमद व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मूर्ती तयार केली आहे. नवरात्रोत्सवाच्या आधी या मूर्तीचे 70 टक्के काम पूर्ण झाले तेव्हा 17 सप्टेंबर रोजी आलेल्या वादळात ती पूर्ण उद्‌ध्वस्त झाली होती. त्यानंतर नव्याने सुरवात करूनही एका आठवड्यात मूर्तीचे काम पूर्ण करण्यात अहमद यांना यश आले.

"बांबूपासून बनविलेली ही सर्वांत उंच मूर्ती असल्याचे आमचा दावा असून "गिनिज बुक ऑफ रेकॉड्‌स'ला याबाबत लेखी माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याकडून आता उत्तराची अपेक्षा आहे,'' असे अहमद यांनी सांगितले.

बांबूची मूर्ती बनविण्यामागे पर्यावरणपूरकतेसह देशात व जगातही बांबूपासून बनविलेल्या वस्तूंचा वापर वाढविण्याचे उद्दिष्ट यामागे असल्याचे ते म्हणाले. यासाठी आसामच्या पाठशाला, छायगाव आणि बिजॉयनगर भागात सहा हजार बांबूंची निर्मिती करण्यात आली होती.