मंदसोरकडे जाताना हार्दिक पटेलला अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

मंदसोरला जाण्यापूर्वी हार्दिक पटेल म्हणाले होते, की शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार मारणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. सरकारकडून कोणतीही पाऊले न उचलल्यास देशातील सुमारे 50 कोटी शेतकरी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना बदलतील.

मंदसोर - शेतकऱ्यांचे हिंसक आंदोलन झालेल्या मंदसोर येथे जात असताना पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना आज (मंगळवार) पोलिसांकडून अटक करण्यात आली.

हार्दिक पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांना मध्य प्रदेश-राजस्थान सीमेवर नीमच पोलिसांकडून अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला असून, पुन्हा राजस्थानकडे पाठविण्यात आले आहे. हार्दिक पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांना रोखण्यासाठी नायगाव टोल नाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मंदसोरला जाण्यापूर्वी हार्दिक पटेल म्हणाले होते, की शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार मारणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. सरकारकडून कोणतीही पाऊले न उचलल्यास देशातील सुमारे 50 कोटी शेतकरी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना बदलतील. शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपोषण करत होते. 

काँग्रेस आमदारांवर गुन्हा दाखल
मंदसोर येथे शेतकरी आंदोलनादरम्यान चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या आमदार शकुंतला खाटिक यांच्याविरोधात आज (मंगळवार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.