कर्नाटकात कुमार'स्वामी'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी दिली असून, या बहुमत चाचणीत कुमारस्वामी 'पास' झाले आहेत. 

बंगळूरु : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते आणि मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी दिली असून, या बहुमत चाचणीत कुमारस्वामी 'पास' झाले आहेत. कुमारस्वामी यांच्या बाजूने 117 मते पडली आणि त्यांनी अखेर ही 'परीक्षा' जिंकली.

karnataka assembly

भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर कुमारस्वामींनी बुधवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कुमारस्वामी यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आज (शुक्रवार) त्यांना बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले. कर्नाटक विधानसभेत भाजप किंवा काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजपला 104, काँग्रेसला 78 तर जेडीएसला 37 जागा मिळाल्या. या विधानसभेच्या निकालानंतर भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता. त्यानंतर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली होती. मात्र, काही तासांतच येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला होता. 

या सर्व राजकीय घडामोडीनंतर कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले असून, आज त्यांच्या सरकारची घेण्यात आलेली बहुमत चाचणी पूर्ण झाली असून, कुमारस्वामी हेच कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी राहणार हे सिद्ध झाले आहे. 

Web Title: HD Kumaraswamy Passes the Floor test at Karnataka Vidhana Saudha