संशयास्पद हालचालींनंतर पठाणकोटमध्ये "हाय अलर्ट'

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर दशहतवाद्यांनी गेल्या 2 जानेवारी रोजी मोठा हल्ला चढविला होता. हे दहशतवादी बमियालमधूनच आल्याचे नंतर निष्पन्न झाले होते. या पार्श्‍वभूमीवर पठाणकोट येथे "हाय अलर्ट'चे वातावरण आहे

चंडीगड - पाकिस्तानच्या सीमारेषेजवळ असलेल्या पंजाबमधील बमियाल भागामध्ये तीन व्यक्ती एका गाडीमधून संशयास्पद पद्धतीने फिरताना दिसल्याने पठाणकोट येथील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर दशहतवाद्यांनी गेल्या 2 जानेवारी रोजी मोठा हल्ला चढविला होता. हे दहशतवादी बमियालमधूनच आल्याचे नंतर निष्पन्न झाले होते. या पार्श्‍वभूमीवर पठाणकोट येथे "हाय अलर्ट'चे वातावरण आहे.

संशयास्पद पद्धतीने फिरणाऱ्या या तीन व्यक्तींना येथील स्थानिक नागरिकांनी हटकल्यानंतर ते गाडीमधून पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. ""या भागामध्ये काही संशयास्पद व्यक्ती फिरत असल्याची माहिती मिळाली होती. या पार्श्‍वभूमीवर या भागामध्ये आता मोठी शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पठाणकोट डलहौसी रस्ता मोकळा करण्यात आला आहे,'' असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाची भारतीय लष्करासही देण्यात आली आहे.

भारत व पाकिस्तानमधील सध्याचे तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर हे वृत्त अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.