हिंदू युवा वाहिनी भाजपविरोधात लढणार

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

उत्तर प्रदेशात सर्व जागांवर निवडणूक लढविणार आहोत. पूर्वांचलमधील नागरिकांची इच्छा आहे, की योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असावेत. मात्र, भाजपने याला नकार दिला आहे.

लखनौ - भाजपने खासदार योगी आदित्यनाथ यांचा अपमान केला असून, आम्ही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात लढणार आहोत, असे हिंदू युवा वाहिनीचे अध्यक्ष सुनील सिंह यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपने योगी आदित्यनाथ यांचा समावेश केलेला आहे. मात्र, तरीही 2002 मध्ये स्थापन झालेल्या हिंदू युवा वाहिनीने भाजपला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती योगी आदित्यनाथ यांनाही नसल्याचे समोर आले आहे. भाजपने हिंदू युवा वाहिनीचे संस्थापक आणि गोरखनाथ मंदिराचे संतांचा अपमान केल्याचे म्हटले आहे.

सुनील सिंह म्हणाले, की आम्ही उत्तर प्रदेशात सर्व जागांवर निवडणूक लढविणार आहोत. पूर्वांचलमधील नागरिकांची इच्छा आहे, की योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असावेत. मात्र, भाजपने याला नकार दिला आहे. आदित्यनाथ यांनी हिंदू युवा वाहिनीच्या दहा उमेदवारांना उमेदवारी मिळण्यासाठी यादी दिली होती. मात्र, दोनच उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही आता आणखी सहन करणार नाही आणि भाजपविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.