'त्या' दहशतवाद्याच्या वडिलांचा सरकारला अभिमान : राजनाथसिंह

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

ही संपूर्ण घटना आणि सरताज यांच्या प्रतिक्रिया राजनाथसिंह यांनी सभागृहात सांगितल्या. ते म्हणाले, "मला त्या वडिलांबद्दल सहानुभूती आहे आणि मला खात्री आहे की संपूर्ण सभागृह माझ्यासोबत आहे. मोहम्मद सरताज यांचा सरकारला अभिमान आहे.'

नवी दिल्ली - लखनौ येथे लपून बसलेला आणि पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झालेला दहशतवादी सैफुल्लाच्या (वय 22) वडिलांचा सरकारला अभिमान असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज (गुरुवार) लोकसभेत बोलताना सांगितले.

लखनौमध्ये पोलिस चकमकीत ठार झालेला संशयित दहशतवाद्याचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला. "जो देशाचा होऊ शकला नाही, तो माझा कसा होऊ शकेल? एक देशद्रोही माझा मुलगा असूच शकत नाही. आम्ही त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही', अशा प्रतिक्रिया सैफुल्लाचे वडील सरताज मोहम्मद यांनी व्यक्त केल्या. ही संपूर्ण घटना आणि सरताज यांच्या प्रतिक्रिया राजनाथसिंह यांनी सभागृहात सांगितल्या. ते म्हणाले, "मला त्या वडिलांबद्दल सहानुभूती आहे आणि मला खात्री आहे की संपूर्ण सभागृह माझ्यासोबत आहे. मोहम्मद सरताज यांचा सरकारला अभिमान आहे.'

लखनौच्या वेशीवर असलेल्या "हाजी कॉलनी' नावाच्या दाट वस्तीतील एका घरात मध्य प्रदेशातील रेल्वे स्फोटाशी संबंधित सैफुल्ला हा दहशतवादी दडून बसल्याची माहिती राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. या पथकाने त्या घराला वेढा घालून घरात दडून बसलेल्या सैफुल्लाला शरण येण्यास सांगितले. पण शरण येण्यापेक्षा मृत्यू स्वीकारीन असे सांगत सैफुल्लाने पोलिसांवरच गोळीबार केला. बारा तासांच्या चकमकीनंतर सैफुल्लाचा खात्मा झाला.

Web Title: Home Minister Rajnath Singh In Parliament Says Government Proud Of Saifullah's Father