पालकांच्या इच्छेविना घरात राहणे बेकायदेशीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : विवाहित मुलांनी पालकांच्या इच्छेविना घरात राहणे बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. जर घर पालकांनी स्वकमाईने घेतले असल्यास केवळ त्यांच्या दयेवरच मुले त्या घरात राहू शकतात, असेही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : विवाहित मुलांनी पालकांच्या इच्छेविना घरात राहणे बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. जर घर पालकांनी स्वकमाईने घेतले असल्यास केवळ त्यांच्या दयेवरच मुले त्या घरात राहू शकतात, असेही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

पालकांशी चांगले संबंध असताना घरात रहायला आल्यावर हयातभर घरात ठेवणे पालकांसाठी बंधनकारक नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. जर पालकांनी स्वकमाईने घर घेतले असेल, तर त्यांची मुले विवाहीत असो किंवा अविवाहीत त्यांना आईवडिलांच्या इच्छेविना घरात राहता येणार नाही. जर ते तसे राहत असतील तर ते बेकायदेशीर मानले जाईल, असे न्या. प्रतिभा रानी यांनी दिलेल्या निकालात म्हटले आहे.

याबाबत मुलगा आणि सुनेने पालकांविरोधात न्यायालयात खटला भरला होता. पालकांची बाजू घेत मुलगा व सुनेने ताबा घेतलेले घर रिकामे करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. पालक हे ज्येष्ठ नागरीक असून त्यांनी कनिष्ठ न्यायालयात मुलगा व सून यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात धाव घेतली होती. सोबत राहणाऱ्या मुलगा व सुनेने आपल्या आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा केल्याचे त्यांचे म्हणणे होते. मुलगा सुनेविरोधात त्यांनी पोलिस तक्रारही केली होती. तसेच 2007 व 2012 मध्ये पालकांनी आपल्या मुलाला घर सोडण्याबाबत नोटीसही दिली होती.

त्यानंतर मुलगा व सुनेने पालकांचा ताबा असलेल्या मालमत्तेचे सहमालक असल्याचा दावा करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्यात न्या. रानी यांनी पालकांच्या बाजूने निकाल देत मुलगा व सुनेचा सहमालक असल्याचा दावाही फेटाळून लावला.