राष्ट्रकुल देशांच्या युवा निर्देशांकात भारत तळाला

पीटीआय
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

जगातील पाचपैकी एक युवक भारतात राहत असून, त्यानेच भारताला सर्वांत तरुण देश बनविले आहे. भारताची एकूण कामगिरी निराशाजनक आहे. मात्र ही आकडेवारी 2010 ते 2015 या आर्थिक वर्षांमधील असल्याने त्यामध्ये आणखी सुधारणा होऊ शकतात. भारतीय युवकांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींमध्ये आणखी सुधारणा आवश्‍यक आहेत, त्या झाल्या तर भारत "लोकसंख्येचा लाभांश' (डेमोग्राफिक डिव्हिडंड) होईल.
-आभिक सेन, प्रमुख लेखक, "2016 ग्लोबल यूथ डेव्हलपमेंट इंडेक्‍स' अहवाल

लंडन : राष्ट्रकुल देशांच्या युवा निर्देशांकामध्ये भारताची नीचांकी पातळीवर असल्याचे समोर आले आहे. एकूण युवा निर्देशांकामध्ये 183 राष्ट्रकुल देशांच्या यादीमध्ये भारत 133व्या स्थानावर आहे. युवकांमधील रोजगाराचे प्रमाण, शिक्षण, आरोग्य, प्रशासन आणि राजकीय समज या निकषांवर हा राष्ट्रकुल देशांचा युवा निर्देशांक तयार करण्यात आला आहे.

युवा निर्देशांकात भारत जरी तळाला असला तरी भारताच्या शेजारील देशांनी मात्र या निर्देशांकामध्ये आघाडी घेतली आहे. या निर्देशांकामध्ये नेपाळ (77), भूतान (69) आणि श्रीलंका (31) आदी दक्षिण आशियातील देश प्रगतीच्या मार्गावर असल्याचे निर्देशांकावरून दिसून येते. निर्देशांकाच्या आकडेवारीमध्ये सध्याची आर्थिक अवस्था (58%), किशोरवयीन जन्मदातील घट (29%), नव्या युवा धोरणांचे संगोपन व माध्यमिक नोंदणी दरातील सुधारणा (9%) असे गुणांकन देण्यात आले असल्याचे "2016 ग्लोबल यूथ इंडेक्‍स' अहवालात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रकुल युवा निर्देशांकातील प्रमुख 10 देश

  1. जर्मनी
  2. डेन्मार्क
  3. ऑस्ट्रेलिया
  4. स्वित्झर्लंड
  5. ब्रिटन
  6. नेदरलॅंड
  7. ऑस्ट्रिया
  8. लक्‍झेंबर्ग
  9. पोर्तुगाल
  10.  जपान

जगातील 20 टक्के तरुण भारतात
सध्या भारताच्या खात्यामध्ये जगाच्या 20 टक्के युवा मनुष्यबळ आहे. देशामध्ये 345 दशलक्ष युवक असून, त्यांचे वय 15 ते 30 दरम्यान आहे. म्हणजेच देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 27 टक्के युवक आहेत. जणू भारत "तरुणाईचा फुगवटा' झाला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे उपयुक्त मनुष्यवळ देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणार आहे. मात्र यासाठी कठोर युवा धोरणांचा अंतर्भाव आवश्‍यक आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: India at the bottom in Commonwealth index for youth