कुलभूषण जाधव यांची शिक्षा रद्द करा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

आईची साद 
आता कुलभूषण जाधव यांच्या आईनेही या प्रकरणात पाकिस्तान सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी करत कुलभूषण यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारताने कुलभूषण यांच्या आईचे म्हणणे पाकिस्तान सरकारसमोर सादर केले आहे. आता यावर पाकिस्तान सरकार नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कथित हेरगिरीचा आरोप करत फाशीची शिक्षा ठोठावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आता कुलभूषण यांच्या फाशीविरोधात त्यांच्या आईने अपिलीय न्यायालयात धाव घेतली आहे.

कुलभूषण यांची फाशीची शिक्षा रद्द केली जावी अशी मागणी त्यांनी याचिकेच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान कुलभूषण यांना आपली बाजू न्यायालयामध्ये मांडण्यासाठी चांगला वकील मिळवून दिला जावा, अशी मागणी भारताने पाकिस्तान सरकारकडे केली असून, पाकने मात्र ती पुन्हा फेटाळून लावली आहे. 

जाधव हे गुप्तचर असल्याने त्यांना कायदेशीर मदत मिळवून देता येणे शक्‍य नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. द्विपक्षीय करारान्वये निर्धारित अटी आणि शर्ती येथे लागू होत नसल्याचा पुनरुच्चार पाकिस्तानने केला आहे. इस्लामाबादेतील भारताचे उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव तेहमिना जानुजा यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधीचे निवेदन सादर केले होते. 

आतापर्यंत भारत सरकारने तब्बल बारावेळा पाकिस्तान सरकारकडे कुलभूषण यांना वकील देण्याची मागणी केली असून, पाकने मात्र ती वारंवार फेटाळून लावली आहे. कुलभूषण यांना वकील दिला जाऊ नये अशी सूचना पाकिस्तानच्या लष्कराने तेथील सरकारला केली आहे. चौदा एप्रिल रोजी बंबवाले यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांची भेट घेऊन हा मुद्दा उपस्थित केला होता, तसेच जाधव यांच्या भवितव्याबाबत चिंताही व्यक्त केली होती. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचा विचार करून जाधव यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जावी, असे भारताने म्हटले होते. 

आईची साद 
आता कुलभूषण जाधव यांच्या आईनेही या प्रकरणात पाकिस्तान सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी करत कुलभूषण यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारताने कुलभूषण यांच्या आईचे म्हणणे पाकिस्तान सरकारसमोर सादर केले आहे. आता यावर पाकिस्तान सरकार नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: India files appeal with Pakistan in Kulbhushan Jadhav case