रामपूरनंतर बिहारमध्येही विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा व्हिडिओ!

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे दोन महिलांच्या विनयभंगाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. हे प्रकरण आणखी शांत झालेले नसतानाच बिहारमधील मुझफ्फरनगरमध्येह घडलेल्या अशाच एका विनयभंगाच्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मुझफ्फरनगर (बिहार) : उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे दोन महिलांच्या विनयभंगाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. हे प्रकरण आणखी शांत झालेले नसतानाच बिहारमधील मुझफ्फरनगरमध्येह घडलेल्या अशाच एका विनयभंगाच्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये मुझफ्फरनगरमधील बुधी गंडक रेल्वे पूलावर आपल्या मित्रासोबत एक शालेय विद्यार्थीनी जात असताना दिसत आहे. त्यावेळी काही जणांनी तिच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते मुलीची छेडछाड करू लागले. यावेळी मुलगी तिच्या मित्राच्या मागे लपून सोडून देण्याची विनंती करत बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिक्षक विवेक कुमार यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे रस्त्यावरून जाणाऱ्या दोन मुलींचा भरदिवसा विनयभंग करून या प्रकाराचा व्हिडिओ करण्यात आला होता. या प्रकारामुळे उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. मात्र आता बिहारमध्येही असाच प्रकार घडल्याने तेथील महिलांच्या सुरक्षितेविषयीही प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहेत.