संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या 12 जुलैपासून शक्‍य

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 जून 2017

नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन 12 जुलैपासून सुरू होऊ शकते आणि अधिवेशन समाप्तीची तारीख 10 ऑगस्ट असेल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी आज दिली. राष्ट्रपतिपदाची निवडणूक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरून आक्रमक विरोधकांमुळे हे अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन 12 जुलैपासून सुरू होऊ शकते आणि अधिवेशन समाप्तीची तारीख 10 ऑगस्ट असेल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी आज दिली. राष्ट्रपतिपदाची निवडणूक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरून आक्रमक विरोधकांमुळे हे अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन जानेवारीअखेरीस सुरू होऊन 31 मार्चपूर्वीच संपले. यामुळे पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनांच्याही वेळापत्रकात बदल होऊ शकतो, असे सांगितले जात होते; परंतु सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आलेल्या पावसाळी अधिवेशन आरंभाची संभाव्य तारीख (12 जुलै) पाहता, पूर्वीचेच वेळापत्रक कायम असल्याचे दिसते. प्रथेप्रमाणे पावसाळी अधिवेशनाची सांगताही 15 ऑगस्टपूर्वी होते. अर्थात, वेळापत्रक निश्‍चितीचा औपचारिक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाजविषयक समिती (सीसीपीए) करेल. गृहमंत्री राजनाथसिंह हे या समितीचे प्रमुख असून समितीची बैठक पुढील आठवड्यात होऊ शकते.

पावसाळी अधिवेशनादरम्यानच राष्ट्रपतिपदाची निवडणूक (17 जुलै) होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकजुटीचे रणशिंग फुंकले आहे. विरोधकांचा सहमतीचा उमेदवार उभा करण्यासाठी एक समितीही नेमण्यात आली असून या समितीची उद्या (ता. 14) बैठक होणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रपती निवडणुकीतील मतांचे गणित पूर्णत: अनुकूल असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा असून कोणत्याही परिस्थितीत विरोधकांचा दबाव मान्य करायचा नाही, असा निर्धारही सरकारचा आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपने उमेदवार निश्‍चितीवरून राजकीय पक्षांशी चर्चा करण्यासाठी गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि माहिती व प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांची समितीही नेमली आहे.