भारत-पाकिस्तान सामन्यांनतर आपोआप संबंध सुधारतील

पीटीआय
रविवार, 11 जून 2017

पाकिस्तानी अर्थतज्ज्ञ अकबर झैदी यांचा आशावाद
 

कोलकता : भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने सुरू झाल्यास दोन्ही देशांतील संबंध आपोआप सुरळीत होतील, असा आशावाद पाकिस्तानी शिक्षणतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ एस. अकबर झैदी यांनी शनिवारी व्यक्त केला.

बंगाल चेंबर ऑफ कॉमर्समध्ये आयोजित कार्यक्रमात झैदी बोलत होते. ते म्हणाले, "क्रिकेट सामने खेळण्यासाठी पाकिस्तान सरकार रस दाखवत आहे; मात्र मला वाटते की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) राजकीय कारणासाठी क्रिकेट खेळण्यास इच्छुक नाही. क्रिकेट सामने सुरू झाल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध आपोआप सुरळीत होतील.''

कार्यक्रमात सुरवातीला बोलताना केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी पाकिस्तानकडून सीमेवर सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत केंद्र सरकार दोन्ही देशांमधील क्रिकेट सामन्यांना परवानगी देणार नाही, असे स्पष्ट केले. सध्या आयसीसी टूर्नामेंटस्‌ आणि एशिया कपमधील सामन्यांत दोन्ही देश एकमेकांशी सामने खेळत आहेत. दोन्ही देशांदरम्यान 2015-23 या कालावधीत पाच मालिका खेळण्याच्या कराराचा पालन न केल्याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने याआधीच बीसीसीआयला कायदेशीर नोटीस बजावली आहे.