भारतीय पत्नीला जबरदस्ती घेतले ताब्यात

पीटीआय
सोमवार, 8 मे 2017

व्हिसा अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयात गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी आपल्या पत्नीला जबरदस्ती ताब्यात घेतल्याचा आरोप पाकिस्तानी नागरिकाने केला आहे. याबाबत त्याने पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे.

इस्लामाबाद - व्हिसा अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय उच्च आयोगाच्या कार्यालयात गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी आपल्या पत्नीला जबरदस्ती ताब्यात घेतल्याचा आरोप पाकिस्तानी नागरिकाने केला आहे. याबाबत त्याने पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे.

नवी दिल्लीतील उझमा व ताहीर यांची मलेशियात भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी विवाह करण्याचा निर्णयही घेतला. त्यानंतर उझमा 1 मे रोजी भारतातून पाकिस्तानमध्ये गेली आणि तेथे 3 मे रोजी त्यांचा विवाह संपन्न झाला होता. ताहीर आपल्या व्हिसासाठी पत्नीसह येथील उच्च आयोगाच्या कार्यालयात गेला होता. तेथे त्याने त्याबाबतचा अर्ज सादर केला.

दरम्यान, तेथील अधिकाऱ्यांनी त्याच्यांकडील मोबाईल फोन काढून घेतले होते. नंतर अधिकाऱ्यांनी उझमा हिला आत बोलावून घेतले; मात्र काही तास लोटले तरी, ती बाहेर न आल्याने ताहीरने याची चौकशी केली. तेव्हा उझमा येथे नसल्याचे त्याला सांगण्यात आले. काढून घेतलेले फोन परत करण्यासही अधिकाऱ्यांनी नकार दिला, असे ताहीरने म्हटले आहे.

आरोप फेटाळले
ताहीरला आपण त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी कार्यालयात बोलावले असून, त्याला त्याचा व्हिसाही प्रदान करण्यात येणार आहे, असे उच्च आयोग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. उझमा तिच्या इच्छेनुसार तेथे राहत असल्याचा दावाही आयोगाने केल्याचे जिओ न्यूजने म्हटले आहे.