जगनमोहन रेड्डी हे आंध्रचे डेरा बाबा

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

डेरा बाबाचे संघटन कौशल्य चांगले होते. पण त्याने त्याच्या अधिकाराचा गैरवापर केला आणि महिलांच्या त्याच्यावरील विश्‍वासाला तडा गेला. त्याने दहशत निर्माण हिंसाचाराला पाठिंबा दिला. साधूच्या वेषात त्याने अत्याचाराची परिसीमा गाठली. आमचा माणूसही डेरा बाबासारखाच असल्याने मी त्याला "जगन बाबा' म्हणतो

अमरावती (आंध्र प्रदेश) - आंध्र प्रदेश विधीमंडळाचे विरोधी पक्ष नेते वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची तुलना डेरा सच्चा सौदा आश्रमाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याच्याशी करून मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्यावर टीका केली.

"" तो डेरा बाबा आहे आणि आमचा जगन बाबा आहे. ते विध्वंसक व गुन्हेगारी वृत्तीचे आहेत,'' असे नायडू यांनी सचिवालयात सोमवारी (ता.28) सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. बलात्काराच्या दोन घटनांमध्ये गुरमीत राम रहीम सिंग याला "सीबीआय'च्या विशेष न्यायालयाने काल 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याविषयी बोलताना चंद्राबाबू म्हणाले, ""डेरा बाबाचे संघटन कौशल्य चांगले होते. पण त्याने त्याच्या अधिकाराचा गैरवापर केला आणि महिलांच्या त्याच्यावरील विश्‍वासाला तडा गेला. त्याने दहशत निर्माण हिंसाचाराला पाठिंबा दिला. साधूच्या वेषात त्याने अत्याचाराची परिसीमा गाठली. आमचा माणूसही डेरा बाबासारखाच असल्याने मी त्याला "जगन बाबा' म्हणतो.''

जगन यांनी समाजविघातक अनेक कामे केली आहेत. गेल्या तीन वर्षांतील त्यांची वर्तणूक पाहता यातील सत्यता कळेल. अभिनय, असभ्य वर्तन, दमबाजी करणे, विधीमंडळाचे कामकाज बंद पाडणे ही कृत्ये त्यांच्या गुन्हेगारी व विध्वंसक वृत्तीचे निदर्शक आहे. नंद्याल पोटनिवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर कॉंग्रेसचा पराभव झाला. " या मतदारसंघातील नागरिक आता मोकळा श्‍वास घेतील', अशी टिप्पणी चंद्राबाबू नायडू यांनी केली.