जयपूरमध्ये पोलिस व नागरिकांमध्ये धुमश्‍चक्री; संचारबंदी लागू

वृत्तसंस्था
रविवार, 10 सप्टेंबर 2017

एकाचा मृत्यू; संचारबंदी लागू, इंटरनेटसेवा खंडित

जयपूर: रामगंज भागात किरकोळ कारणावरून पोलिस व स्थानिक नागरिकांमध्ये झालेल्या धुमश्‍चक्रीत एकाचा मृत्यू झाला असून, येथील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एकाचा मृत्यू; संचारबंदी लागू, इंटरनेटसेवा खंडित

जयपूर: रामगंज भागात किरकोळ कारणावरून पोलिस व स्थानिक नागरिकांमध्ये झालेल्या धुमश्‍चक्रीत एकाचा मृत्यू झाला असून, येथील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांची कारवाई सुरू असताना एका दांपत्यास काठी लागल्याने बाचाबाची होऊन वाद निर्माण झाला. घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी यात उडी घेतल्याने हा वाद वाढत गेला. नंतर संतप्त जमावाने पोलिसांविरोधात निदर्शने सुरू केली. जमावाने रात्री रामगंज पोलिस ठाण्यामध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसणाऱ्या जमावाने वीज केंद्र, पोलिस जीप, रुग्णवाहिकेसह पाच वाहनांना आग लावून दिली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच रबरी गोळ्यांचाही वापर केला.

या धुमश्‍चक्रीत एका तरुणाचा मृत्यू झाला असून, एका पोलिस कर्मचाऱ्यासह काही जण जखमी झाले आहेत. दरम्यान, सदर तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून, याची सखोल चौकशी करण्यात येईल, असे स्पष्टीकरण पोलिसांच्या वतीने देण्यात आले आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रामगंज, सुभाष चौक, मानक चौक आणि गलता गेट परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून, इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे.
- संजय अगरवाल, जयपूरचे पोलिस महासंचालक

दिल्ली-आग्रा मार्ग विस्कळित
निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम जयपूरमधून जाणाऱ्या दिल्ली-आग्रा महामार्गावरही झाला असून, येथील वाहतूक विस्कळित झाली आहे. ही वाहतूक अन्य मार्गांकडे वळविण्यात आली असून, सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.