हिमस्खलनात 2 जवान हुतात्मा; बचावकार्य सुरू, महामार्ग बंद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारपासून केवळ श्रीनगरमध्येच 83.9 मिमी बर्फवृष्टीची नोंद झाली आहे. 

लडाख : जम्मू-काश्मीरमध्ये लडाख भागातील बटालिक सेक्टरमध्ये झालेल्या अनेक हिमस्खलनांमध्ये अडकलेल्या पाचपैकी दोन जवानांचा मृत्यू झाला. एका जवानाला बाहेर काढण्यात यश आले आहे. लडाख भागातून आतापर्यंत एकूण 4 जवानांना बर्फाखालून बाहेर काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. 

जोरदार हिमवृष्टीमुळे लष्कराची या भागातील एक चौकी बर्फाखाली गाडली गेली. "अभूतपूर्व बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी हिमस्खलन झाले. बटालिक सेक्टरमधील एक चौकी बर्फाखाली गेली. तेथील पाचपैकी 2 जवान बाहेर काढले आहेत," असे नॉर्दर्न कमांडने गुरुवारी उशीरा सांगितले. 
'इतर 3 जवानांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू आहे. विशेष प्रशिक्षित हिमस्खलन बचाव पथके त्या ठिकाणी पाठविण्यात आली आहेत,' असे त्यांनी सांगितले. 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारपासून केवळ श्रीनगरमध्येच 83.9 मिमी बर्फवृष्टीची नोंद झाली आहे. 

मुफ्तींशी पंतप्रधानांची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी परिस्थितीबद्दल चर्चा केली. काश्मीर खोऱ्यातील पूरस्थितीला तोंड देण्यासाठी शक्य ती मदत करू, असे त्यांनी सांगितले. 

महामार्ग बंद
दगड आणि दरडी कोसळत असल्याने काश्मीर खोऱ्याला उर्वरित देशाशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग सलग चौथ्या दिवशी बंद राहिला आहे. यामुळे महामार्गावर अनेक मालवाहू तसेच प्रवासी वाहतूक करणारी वाहने अडकून पडली आहेत. 
 

Web Title: Jammu Kashmir avalanche: Two soldiers dead in Batalik sector in Ladakh