जेठमलानींचा केजरीवालांना धक्का;जेटलींविरोधातील खटल्यातून माघार

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जुलै 2017

नव्या खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत आपण जेठमलानींना अशा स्वरुपाची सूचना दिल्याचे पूर्णत: फेटाळून लावले. यामुळे संतापलेल्या जेठमलानी यांनी या खटल्यामधून माघार घेत असल्याचे घोषित केले आहे

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यामध्ये केजरीवाल यांची बाजू लढविणारे ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांनी आज (बुधवार) या खटल्यामधून माघार घेण्याची घोषणा केली.

केजरीवाल यांनी जेटलींविरोधात जाणीवपूर्वक आक्षेपार्ह भाषा वापरण्यास सांगितल्याचा आरोप जेठमलानी यांनी केजरीवाल यांना यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात केला आहे. याचबरोबर, या खटल्याची 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त फीही केजरीवाल यांनी देऊन टाकावी, अशी मागणी जेठमलानी यांनी केली आहे.

जेटली यांनी केजरीवाल व आपच्या अन्य पाच नेत्यांविरोधात 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान जेठमलानी यांनी जेटली गुन्हेगार असल्याचे मत मांडताना आक्षेपार्ह शब्द वापरला होता. यावेळी, जेटली यांच्याकडून जेठमलानी यांना त्यांच्या अशीलाच्या सुचनेनुसार हा शब्द वापरण्यात आला आहे का, अशी विचारणा केली. यावर जेठमलानींनी होकार देताच जेटलींनी केजरीवाल यांच्याविरोधात 10 कोटींची आणखी एक अब्रुनुकसानीची फिर्याद दाखल केली. या नव्या खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत आपण जेठमलानींना अशा स्वरुपाची सूचना दिल्याचे पूर्णत: फेटाळून लावले. यामुळे संतापलेल्या जेठमलानी यांनी या खटल्यामधून माघार घेत असल्याचे घोषित केले आहे.

या नव्या घडामोडीमुळे केजरीवाल यांच्यापुढील अडचणी आता आणखी वाढल्याचे मानले जात आहे.