काश्‍मीरसह बिहारही घ्या- न्या. मार्कंडेय काटजू

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

"वाजपेयी यांचा मुशर्रफ यांना प्रस्ताव'
तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2001 मध्ये आग्रा परिषदेत असा प्रस्ताव पाकिस्तानचे तेव्हाचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यापुढे ठेवला होता. मात्र, त्या वेळी तो नाकारून मुशर्रफ यांनी मूर्खपणा केला. आता पुन्हा हा प्रस्ताव आला आहे. आता तरी तो नाकारू नये, असे पोरकट विधानही काटजू यांनी फेसबुकवरील या पोस्टवर केले आहे.

पाटणा- "पाकिस्तानने बिहारला घेण्याची तयारी दर्शविली तरच त्यांना काश्‍मीर मिळेल,' अशी टिप्पणी करीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी वाद ओढवून घेतला आहे. काटजू यांनी फेसबुकवर केलेल्या या विधानावरून बिहारमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशा प्रकारे राज्याची बदनामी करणे हा राजद्रोहाचा गुन्हा असून, या प्रकरणात काटजू यांना अटक करावी, अशी मागणी काही येथील राजकीय नेत्यांनी केली आहे.

काटजू यांनी ही पोस्ट रविवारी (ता.25) फेसबुकवर टाकली आहे. पाकिस्तानने बिहार आपल्याकडे घेण्याची तयारी दर्शविल्यास त्यांना काश्‍मीर मिळू शकेल, असा प्रस्ताव त्यांनी पाकिस्तानपुढे ठेवला आहे. "तुम्हाला या राज्यांचे "पॅकेज' घ्यावे लागेल. एकतर तुम्ही काश्‍मीर व बिहार दोन्ही घ्या, नाही तर काहीच मिळणार नाही, असे म्हटले आहे. काटजू यांच्या या वक्‍त्यव्यावर टीकेचा भडिमार होऊ लागल्यानंतर लगेच त्यांनी "ही गंमत होती. असा प्रस्ताव पाकिस्तानला देण्याबाबत मी गंभीर आहे, असे तुम्हाला वाटते का? मी अनेक समाजावर विनोद करीत असतो. हाही एक विनोदच होता. लोकांनी त्यांची विनोदबुद्धी विकसित केली पाहिजे,' असे सांगून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ""मी बिहारचा आदर करतो. बिहारने भारताला गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य, अशोक यांच्यासारखी उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची माणसे दिली असून, राज्याचे योगदान मोठे आहे,'' असे ते म्हणाले.

काटजू यांच्या या विधानावरून येथील राजकीय नेते संतप्त झाले आहेत. भाजपचे बिहारमधील प्रमुख प्रवक्ते विनोद नारायण झा यांनी काटजू यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून तातडीने त्यांना अटक करण्याची मागणी केली. त्यांनी केलेले विधान अत्यंत गंभीर असल्याचे झा यांनी म्हटले आहे. भारताची एकता व सार्वभौमत्व नष्ट करण्याच्या देशविरोधी कारवायांना काटजू बळी पडले आहेत का? याबद्दलही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.