सर्व समस्यांसाठी रेल्वेचे एकच ऍप

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

ऍपद्वारे हेही शक्‍य...
रेल्वेशी निगडित मूलभूत सेवांबरोबर या ऍपद्वारे प्रवाशांना टॅक्‍सी, हमाल, तसेच हॉटेल टूर पॅकेजचेही बुकिंग करता येणार असून, ई-कॅटरिंग व प्रवासासंदर्भातील अन्य गोष्टींची माहितीही या ऍपवर उपलब्ध असणार आहे.

नवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निवारण एकाच ठिकाणी व्हावे, या उद्देशाने रेल्वे सध्या एका मोबाईल ऍपवर काम करत असून, हे ऍप जून महिन्यात वापरासाठी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.

प्रवाशांना रेल्वेच्या वेळा, रद्द झालेल्या फेऱ्या, तिकिटांचे आरक्षण, बर्थची उपलब्धता, प्लॅटफॉर्म क्रमांक अशी सर्वसमावेश माहिती या ऍपवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. चालू गाड्यांच्या सद्यःस्थितीविषयी आतापर्यंत कोणतीही माहिती प्रवाशांना वेळेत मिळत नव्हती; मात्र या ऍपद्वारे आता तेही शक्‍य होणार असून, प्रवाशांना त्यांच्या गाड्यांवर याद्वारे नजर ठेवता येणार आहे. या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने प्रवाशांसमोरच्या अडचणी कमी होणार आहेत.

या ऍपचे नाव "हिंदीरेल' ठेवण्याचा विचार सुरू असून, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या ऍपच्या निर्मितीमागे महसूल गोळा करणे हाही एक हेतू असून, या माध्यमातून रेल्वेला वर्षाकाठी 100 कोटी रुपयांचा महसूल मिळेल, असा अंदाज आहे.

ऍपद्वारे हेही शक्‍य...
रेल्वेशी निगडित मूलभूत सेवांबरोबर या ऍपद्वारे प्रवाशांना टॅक्‍सी, हमाल, तसेच हॉटेल टूर पॅकेजचेही बुकिंग करता येणार असून, ई-कॅटरिंग व प्रवासासंदर्भातील अन्य गोष्टींची माहितीही या ऍपवर उपलब्ध असणार आहे.