न्यायाधीश कर्नान यांची राष्ट्रपतींकडे धाव

पीटीआय
शनिवार, 20 मे 2017

कर्नान यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व संबंधितांना याबाबत पत्रे पाठविल्याची माहिती कर्नान यांच्या वकिलाने दिली आहे. दरम्यान, या आदेशाविरोधात कर्नान यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे

नवी दिल्ली - कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कर्नान यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे धाव घेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

न्यायालयाच्या अवमानप्रकरणी सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील सात न्यायाधीशांच्या पीठाने कर्नान यांना 9 मे रोजी सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली होती. या आदेशास स्थगिती द्यावी, अशी मागणी आपण राष्ट्रपतींकडे एका निवेदनाद्वारे केल्याचा दावा कर्नान यांनी केला आहे. मात्र, असे कोणतेही निवेदन कर्नान यांनी सादर केल्याच्या वृत्तास राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून दुजोरा मिळालेला नाही. आपण याबाबत अनभिज्ञ असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.

वकील मॅथ्यू जे नेदुम्पारा व सी. फिलीप यांनी संबंधित निवेदन तयार केले असून, कर्नान यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व संबंधितांना याबाबत पत्रे पाठविल्याची माहिती कर्नान यांच्या वकिलाने दिली आहे. दरम्यान, या आदेशाविरोधात कर्नान यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

राष्ट्रपतींना ई-मेलद्वारे निवेदन
कर्नान यांच्या वतीने कलम 72 अन्वये या आदेशास स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारा ई-मेल राष्ट्रपतींना पाठविण्यात आल्याची माहिती काही वकिलांनी दिली आहे. या कलमान्वये कोणतिही शिक्षा माफ करण्याचा विशेषेधिकार राष्ट्रपतींकडे आहे.