कपिल मिश्रांची "सीबीआय'कडे तक्रार

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

केजरीवाल आणि जैन यांच्यात झालेला दोन कोटींचा व्यवहार, केजरीवालांच्या मेहुण्यासाठी करण्यात आलेला 50 कोटी रुपयांचा जमीन व्यवहार आणि पक्षनिधीचा वापर परदेश दौऱ्यांसाठी करणाऱ्या "आप' नेत्यांविरोधात मिश्रा यांनी तक्रार नोंदविली आहे.

नवी दिल्ली - परदेश दौऱ्यांसाठी पक्षाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करत दिल्ली मंत्रिमंडळातील माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मंत्री सत्येंद्र जैन आणि अन्य "आप' नेत्यांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाकडे तीन (सीबीआय) तक्रारी नोंदविल्या आहेत. या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन "सीबीआय'ने या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिश्रांनी लाचखोरीचा आरोप केल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. ज्या पाच नेत्यांच्या परदेश दौऱ्याचा खर्च आपण मागविला आहे तो जाहीर करण्यात आला नाही, तर आपण उद्यापासून उपोषण करू, असा इशारा मिश्रा यांनी दिला आहे. केजरीवाल आणि जैन यांच्यात झालेला दोन कोटींचा व्यवहार, केजरीवालांच्या मेहुण्यासाठी करण्यात आलेला 50 कोटी रुपयांचा जमीन व्यवहार आणि पक्षनिधीचा वापर परदेश दौऱ्यांसाठी करणाऱ्या "आप' नेत्यांविरोधात मिश्रा यांनी तक्रार नोंदविली आहे.