'लेट्स क्लीन आप' अभियानात सहभागी व्हा: मिश्रा

वृत्तसंस्था
रविवार, 21 मे 2017

आप नेते संजय सिंह आणि आशुतोष यांच्या रशिया दौऱ्याचा खर्च कोणी केला, हे केजरीवाल यांनी सांगावे. या दोघांना शितल सिंह हे रशिया दौऱ्यावर घेऊन गेले होते. शितल सिंह हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशनचा व्यवसाय करतात. दिल्लीत याच व्यवसायाशी संबंधित 400 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे (आप) माजी नेते प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची मी माफी मागतो. सर्व माजी आप नेत्यांनी 'लेट्स क्लीन आप' या अभियानात माझ्यासोबत यावे, असे आवाहन आपमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते कपिल मिश्रा यांनी केले आहे.

कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. तसेच मिश्रा यांनी आपच्या पाच नेत्यांच्या परदेश दौऱ्यावर करण्यात आलेल्या खर्चाची माहिती केजरीवाल यांच्याकडे मागितली होती. केजरीवाल यांनी या प्रकरणी कोणतेही वक्तव्य केले नसून, मिश्रा यांनी उपोषणही केले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी आपच्या नेत्यांवर आरोप केले आहेत.

मिश्रा म्हणाले, की आप नेते संजय सिंह आणि आशुतोष यांच्या रशिया दौऱ्याचा खर्च कोणी केला, हे केजरीवाल यांनी सांगावे. या दोघांना शितल सिंह हे रशिया दौऱ्यावर घेऊन गेले होते. शितल सिंह हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशनचा व्यवसाय करतात. दिल्लीत याच व्यवसायाशी संबंधित 400 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. हे केजरीवाल यांना माहिती आहे. या कंपनीची मान्यता न रद्द करण्यावरून या दोघांना रशियाला नेण्यात आले. मी अरविंद केजरीवाल यांचा अंधभक्त बनूव प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्यावर आरोप केले. आता मी त्यांची हात जोडून माफी मागतो. या दोघांसह माजी आप नेत्यांना 'लेट्स क्लीन आप' अभियानात सहभागी व्हावे. नागरिकांनीही या अभियानात सहभागी होण्यासाठी 7863037300 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा.