कटप्पा जनतेसमोर झुकला

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

"त्या' आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सत्यराज यांचा माफीनामा

चेन्नई : तब्बल नऊ वर्षांपूर्वी कावेरी जलवादप्रकरणी कन्नड जनतेविरोधात आक्षेपार्ह विधान करणारे प्रसिद्ध अभिनेते सत्यराज यांना आज माफी मागावी लागली. दोन दिवसांपूर्वी सत्यराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कर्नाटकमधील वातावरण तापले होते. अनेक कन्नड संघटनांनी "बाहुबली-2 चे' प्रदर्शन रोखण्याचा इशारा दिल्याने निर्मात्यांचे धाबे दणाणले आहे. अखेर जनमताचा रेटा लक्षात घेऊन "बाहुबली'तील या कटप्पाला आपली मान तुकवावी लागली.

"माझा कन्नड लोकांना विरोध नाही, त्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी बिनर्शत माफी मागतो. सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ हा 9 वर्षांपूर्वीचा आहे. माझ्या वक्तव्यामुळे बाहुबलीच्या पूर्ण टीमने केलेल्या कष्टावर पाणी पडू नये. या चित्रपटाच्या तुलनेत मी एक लहान कलाकार आहे,'' असे त्यांनी म्हटले आहे. याआधीही सत्यराज यांनी श्रीलंकेतील "तमीळ ईलम'चा मुद्दा उचलून धरल्याने वाद निर्माण झाला होता.

दिग्दर्शक राजामौळी यांनी या वादात उडी घेत सत्यराज यांनी केलेल्या विधानाची शिक्षा चित्रपटाला दिली जाऊ नये असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होईपर्यंत आम्हाला सत्यराज यांनी केलेल्या वक्तव्याची माहिती नव्हती. सत्यराज यांचे वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत असून, त्याचा चित्रपटाशी काहीही संबंध नाही असे त्यांनी म्हटले आहे.

विरोधाचा सूर
"कन्नड ओकुटा' या संघटनेचे प्रमुख वाटाळ नागराज यांनी आमचा राजामौळी अथवा चित्रपटाला विरोध नाही; पण सत्यराज माफी मागत नाही तोवर आमचा विरोध कायम राहील असे म्हटले होते. बाहुबलीचा दुसरा भाग 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून, त्या दिवशीच या संघटनेने बंगळूर बंदची हाक दिली होती. आता कन्नड संघटना नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.