केदारनाथ हे एक आदर्श तिर्थक्षेत्र असेल: नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमधील लोकांचे त्यांच्या चांगल्या सवयीचे कौतुकही यावेळी केले. चांगली शिस्त ही उत्तराखंडच्या लोकांच्या रक्तातच आहे, येथील प्रत्येक कुटुंबातील एक तरी व्यक्ती सैन्यात असते, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. 

नवी दिल्ली : तिर्थक्षेत्रे कशी असावीत याचे उत्तम उदाहरण केदारनाथ आहे आणि त्याच्या विकासासाठी सरकार कायम कटिबद्ध असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदींनी आज (शुक्रवार) केदारनाथ मंदिरात पूजा केली.

हे एक फक्त देवस्थान नसेल, तर ही एक अशी जागा असेल जी साहसाचे प्रतिक ठरेल. नैसर्गिक सौंदर्य दाखवेल आणि एक पर्यावरणीय आदर्श असेल. देवस्थान बंद होण्याच्या पुर्वसंध्येला पंतप्रधांनानी दिलेल्या भेटीत ते बोलत होते. याआधी त्यांनी मे महिन्यात येथे शेवटची भेट दिली होती. गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा मोदी केदारनाथ येथे आले आहेत. 

पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमधील लोकांचे त्यांच्या चांगल्या सवयीचे कौतुकही यावेळी केले. चांगली शिस्त ही उत्तराखंडच्या लोकांच्या रक्तातच आहे, येथील प्रत्येक कुटुंबातील एक तरी व्यक्ती सैन्यात असते, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. 

केदारनाथला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित केल्यावर ते येथील प्रत्येक माणसासाठी काहीतरी नवीन घेऊन येईल. हिमालय प्रेमी, साहसी दृश्य करण्यास उत्सुक असणारे, तसेच जलप्रेमीं या सगळ्यांना मी केदारनाथमध्ये जे काम करणार आहोत. त्या कामात हातभार लावण्यासाठी आमंत्रित करतो. आपण सर्व मिळुन या तिर्थक्षेत्राचा कसा विकास होईल आणि याला कसे अधिकाधिक महत्व प्राप्त करुन देता येईन यासाठी मैत्रीपुर्ण भावनेतुन पुढे येण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. 

केदारनाथ तिर्थक्षेत्राचा विकास करताना पर्यावरणाची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. आपण केदारनाथमध्ये गुणवत्तापुर्ण पायाभुत सुविधा उभारणार आहोत, हे खुप अधुनिक असेल. परंतु, पारंपारिक नैतिक मुल्ये जपण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करु, यातुन पर्यावरणाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार याची पुर्ण काळजी घेण्यात येईल.

2013 साली पुरात झालेल्या नुकसानानंतर केदारनाथच्या पुनर्रचनेसाठी गुजरात सरकारकडुन आपण मदत देऊ केली होती. परंतु त्यावेळेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील यूपीए सरकारच्या दबावाला बळी पडून गुजरात सरकारच्या मदतीची गरज नसल्याचे म्हटले होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर तिर्थक्षेत्र पुनर्रबांधणीसाठी बाबा केदारनाथ मला ताकद देतील हे माहीत होते असेही यावेळी मोदी म्हणाले.