लिंग कापणाऱ्या महिलेचे कृत्य धाडसी : केरळच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे लिंग कापणाऱ्या महिलेचे कृत्य धाडसी असल्याचे म्हणत मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी तिचे कौतुक केले आहे.

तिरुअनंतपुरम (केरळ) : बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे लिंग कापणाऱ्या महिलेचे कृत्य धाडसी असल्याचे म्हणत मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी तिचे कौतुक केले आहे.

शुक्रवारी रात्री तिरुअनंतपुरममधील पेताह येथे स्वामी गणेशानंद (वय 54) नावाच्या व्यक्तीने एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि महिला परस्परांना ओळखत होते. महिलेसह तिच्या कुटुंबियांनाही आरोपी ओळखत होता. पूजेच्या निमित्ताने महिलेच्या घरी त्याचे येणे-जाणे होते. महिलेचे वडिल आजारी असल्याने अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यामुळे आरोपीने महिलेच्या आईशी मैत्री केली आणि त्यांच्या घरात येणे-जाणे सुरू केले. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या सहा वर्षांपासून तो महिलेचा लैंगिक छळ करत होता. शुक्रवारी तो तिच्या घरी आला आणि बलात्काराचा प्रयत्न करू लागला. महिलेने स्वत:च्या रक्षणासाठी धारदार चाकूने त्याचे लिंग कापले. गंभीर जखमी झाल्याने आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती ठीक असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली असून महिलेविरुद्ध तक्रार दाखल केलेली नाही.

या घटनेबाबत मुख्यमंत्री विजयन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून त्यांनी महिलेच्या कृत्याचे समर्थन केले आहे. "हे एक धाडसी कृत्य होते यात काहीही शंका नाही', असे म्हणत विजयन यांनी महिलेचे कौतुक केले आहे.

Web Title: Kerala CM lauds woman's 'courageous step' of castrating rapist