तुरुंगातून पळालेल्या हरमिंदर मिंटूला दिल्लीत अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

पोलिसांच्या गणवेशात आलेल्या शस्त्रधारी हल्लेखोरांनी अतिसुरक्षित नभा तुरुंगावर हल्ला करत हरमिंदर मिंटू याच्यासह सहा कैद्यांना पळवून नेले होते.

पतियाळा - पंजाबमधील नभा तुरुंगातून पळालेला खलिस्तान लिबरेशन फ्रंटचा प्रमुख हरमिंदर मिंटू याला आज (सोमवार) दिल्लीत रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांच्या गणवेशात आलेल्या शस्त्रधारी हल्लेखोरांनी अतिसुरक्षित नभा तुरुंगावर हल्ला करत हरमिंदर मिंटू याच्यासह सहा कैद्यांना पळवून नेले होते. या धक्कादायक घटनेनंतर पंजाब सरकारने तातडीने तुरुंग महासंचालक आणि इतर दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. तसेच यांच्या शोधासाठी पथके बनविली होती. अखेर दिल्ली पोलिसांना याला अटक करण्यात यश आले आहे.

पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या युवकांच्या एका गटाने हा हल्ला केला. यानंतर सहा कैद्यांना घेऊन ते पळून गेले. हरमिंदर मिंटू याच्यासह विकी गुंदर, गुरप्रित सेखोन, नीता देओल, अमनदीप धोतियॉं आणि विक्रमजित अशी तुरुंगातून पळून गेलेल्या कैद्यांची नावे होती. मिंटूला पोलिसांनी 2014 मध्ये दिल्ली विमानतळावर अटक केली होती. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित राम रहिमसिंग यांच्यावरील हल्ल्यासह एकूण दहा आरोपांखाली ही अटक झाली होती. हवाई दल केंद्रावर स्फोटके नेल्याचाही मिंटूवर गुन्हा आहे.