मी कायद्याची एजंट; कायद्यानेच काम करते : किरण बेदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

पुद्दुचेरीच्या राज्यपाल या भारतीय जनता पक्षाचा एजंट असल्याचा आरोप पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना बेदी यांनी "मी कायद्याची एजंट असून कायद्यानेच काम करते', असे म्हटले आहे.

नवी दिल्ली : पुद्दुचेरीच्या राज्यपाल या भारतीय जनता पक्षाचा एजंट असल्याचा आरोप पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना बेदी यांनी "मी कायद्याची एजंट असून कायद्यानेच काम करते', असे म्हटले आहे.

पुद्दुचेरी विधानसभेच्या आमदार म्हणून बेदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या तीन सदस्यांचे नामांकन केले होते. त्याविरुद्ध कॉंग्रेसच्या सदस्यांनी बुधवारी विधानसभेत तीव्र निदर्शने केली. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी बेदींवर निशाणा साधला होता. यासंदर्भात वृत्तसंस्थेशी बोलताना बेदी म्हणाल्या, "मी कायद्याची एजंट आहे. कायद्यासाठी आपण कायद्याप्रमाणे काम करतो. मी त्याप्रमाणेच काम करते.' "केंद्रशासित प्रदेशांच्या कायद्यानुसार केंद्राने तीन आमदारांचे नामांकन केले आहे', अशी माहिती बेदी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

अतिशय गोपनीय पद्धतीने व्ही. सामीनाथन, के. जी. शंकर आणि एस. सेल्वागणपत्ये यांना पुद्दुचेरीच्या आमदार पदाची शपथ देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे विधासभा अध्यक्ष आमदारांना शपथ देतात. मात्र या प्रकारात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार राज्यपालांनीच आमदारांना शपथ दिली.