बेळगावातील "ऑक्‍सिजन पार्क'वर पुन्हा संकट 

बेळगावातील "ऑक्‍सिजन पार्क'वर पुन्हा संकट 

बेळगाव - बेळगावचा "ऑक्‍सिजन पार्क' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॅक्‍सिन डेपोतील वनसंपदेला पुन्हा धोका निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेतील हेरिटेज पार्कसाठी तेथील 535 झाडे तोडण्याची परवानगी वन खात्याकडे मागण्यात आली आहे. मात्र, वनखात्याने अद्याप निर्णय घेतलेला आहे. 

शंभर एकरहून अधिक जागेत विस्तारलेल्या व्हॅक्‍सिन डेपोत चेक डॅम बांधण्यासाठी आधीच 13 झाडे तोडली आहेत. आता पुन्हा 535 झाडे तोडण्याचा घाट घालण्यात आला आहे. स्मार्ट सिटी लिमिटेडने 17 मे रोजी याबाबतचे पत्र जिल्हा वनाधिकाऱ्यांना पाठविले आहे. 

टिळकवाडीतील व्हॅक्‍सिन डेपो सध्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे कार्यालयही याठिकाणी आहे. 2007 मध्ये राज्यात धजद व भाजपचे सरकार असताना याठिकाणी सुवर्णसौध बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सुवर्णसौधची कोनशीलाही बसवली होती. मात्र, सोशल जस्टीस फोरम व अन्य पर्यावरणप्रेमी संघटनांनी त्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. 2008 मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी व्हॅक्‍सिन डेपोत सुवर्णसौध बांधण्याचा निर्णय मागे घेतला होता. 

हेरिटेज पार्क निर्मितीचे काम सुरु झाल्यानंतर तेथील नाल्याची सुधारणा करण्यात येणार आहे. नाल्याच्या सुमारे 540 मीटर लांबीच्या भागात दगड व कॉंक्रिटने पिचिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी नाल्याच्या काठावरची झाडे तोडण्याची गरज असल्याचे स्मार्ट सिटी विभागाचे म्हणणे आहे. पण, झाडे तोडून हेरिटेज पार्क करण्यात काय अर्थ आहे, असा पर्यावरणप्रेमींचा सवाल आहे. 

व्हॅक्‍सिन डेपोची वैशिष्ट्ये 
- 100 एकर जागेत मोठी वृक्षसंपदा 
- अनेक पशुपक्षांचे वास्तव्य 
- दहा हजारहून अधिक लोकांच्या मॉर्निंग वॉकचे ठिकाण 
- अनेक जुन्या वास्तू 
- ग्लास हाऊसचीही उभारणी 

मंजुरी अशक्‍य? 
झाडे तोडण्याचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव वन खात्याकडे पोचला आहे. पण, वन खाते या प्रस्तावाला मंजुरी देणार नसल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. वन खात्याच्या या निर्णयाला पर्यावरणप्रेमींकडूनही बळ मिळणे आवश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com