बक्षिसाच्या शंभराच्या नोटेचे मोल अनमोल

zakir hussain
zakir hussain

झाकीर हुसेन यांची भावना; बालपणीच्या आठवणींचा खजिना रसिकांसमोर खुला

कोलकता: "मी बारा वर्षांचा असताना मुंबईत झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात नामवंत सरोदवादक उस्ताद अली अकबर खॉं यांना एकदा साथ दिली होती. त्या वेळी खूष होऊन त्यांनी मला 100 रुपयांची नोट बक्षीस दिली होती. ती नोट आजही मी जपून ठेवली आहे,'' अशी आठवण तबलानवाज झाकीर हुसेन यांनी रसिकांसमोर सांगितली.

"सुमारे 54 वर्षांपूर्वी मिळालेली 100 रुपयांची नोट ही माझ्यासाठी अनमोल पुरस्कार आहे,'' अशी भावना झाकीर हुसेन यांनी कोलकत्यामधील "मास्टर क्‍लास विथ द लिजंड' या कार्यक्रमात व्यक्‍त केली. कार्यक्रमाचा मेहनताना म्हणून एक हजार रुपये मिळाल्यानंतर माझा जन्म तबल्यासाठी झाला आहे, हे माझ्या आईला कसे पटले, याचीही आठवण त्यांनी सांगितली. ते म्हणाले,

"माझे वडील अल्लारखॉं हे त्या काळचे प्रख्यात तबलजी होते. कलाकार म्हणून मोहन स्टुडिओशी झालेल्या करारानुसार त्यांना दर महिन्याला 350 रुपये मिळत. ते पाहून मी तबलावादन क्षेत्रात जाऊ नये, असे तिला वाटत असे. आपल्या मुलाने डॉक्‍टर व्हावे, अशी आईची इच्छा होती. यासाठी तिने मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले होते. मुंबईच्या माहीममध्ये मी 1957-58 या काळात राहत होतो.''

""त्या वेळी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात तबलावादन कमी दर्जाचे मानले जात असे. मात्र, उस्ताद करमतुल्ला खॉं, पं. किशन महाराज, पं. समता प्रसाद आणि उस्ताद अल्लारखॉं यांनी तबलावादकांना मानाचे स्थान मिळवून दिले,'' असे सांगून झाकीर हुसेन आपले बालपण रसिकांसमोर मांडले. ""माझे वडील खूप आजारी असल्याने कुटुंब चिंताग्रस्त होते. अशा काळात माझा जन्म 1951 मध्ये झाला. एकदा अल्लारखॉं यांनी माझ्या कानात तबल्याचे बोल गुणगुणले. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर मी त्यांच्या मांडीत बसलो की ते रोज माझ्या कानात तबल्याचे बोल सुनवत असत. अशा प्रकारे त्यांच्या कणाकणातील संगीत माझ्या अंगात भिनले. तबलावादकाला आवश्‍यक सर्व ताल जे माझ्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडून शिकविले गेले होते, ते मी दोन वर्षांचा असतानाच मला ज्ञात झाले होते,'' अशी आपल्या कलेबद्दल व वाडवडिलांबद्दलची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

अमेरिकेहून भारताची वारी
महाविद्यालयीन आठवणीत रमताना हुसेन म्हणाले की, मी 18 वर्षांचा असताना न्यूयॉर्कला गेलो होतो. माझ्या वडिलांना भारतात परतावे लागल्याने पं. रवी शंकर यांना मी तीन कार्यकमांमध्ये साथ केली. पं. रवी शंकर आणि वडिलांनी मला अमेरिकेच्या प्रेक्षकांसमोर सादर केले. पंडितजींनी वॉशिंग्टन विद्यापाठात माझ्यासाठी नोकरीचीही व्यवस्था केली. मी दोन वर्षांनी भारतात परतलो; पण अमेरिकेतील वास्तव्यात मी प्रत्येक हिवाळ्यात भारतात येऊन कार्यक्रम करीत असे. माझ्या लोकांनी मला स्वीकारावे, हा हेतू यामागे होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com