अजमेर बॉंबस्फोटप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

अजमेर दर्ग्यामधील बॉंबस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता या दोघांना बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याशिवाय पटेलला 10 हजार आणि गुप्ताला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

जयपूर - अजमेर दर्ग्यामधील बॉंबस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता या दोघांना बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याशिवाय पटेलला 10 हजार आणि गुप्ताला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

अजमेरमधील सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्‍ती यांच्या दर्ग्यामध्ये ऑक्‍टोबर 2007 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटात तीन जण ठार, तर 15 जण जखमी झाले होते. सुरवातीला राजस्थानच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) तपास सुरू केला होता. 20 ऑक्‍टोबर 2010 रोजी अजमेर न्यायालयात तीन आरोपींच्या विरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते; पण 1 एप्रिल 2011 रोजी "एनआयए'कडे तपास सोपवण्यात आला. "एनआयए'ने या खटल्यात 13 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

8 मार्च रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयाने याप्रकरणात स्वामी असीमानंद यांच्यासह पाच जणांना दोषमुक्त केले होते, तर भावेश पटेल, देवेंद्र गुप्ता आणि सुनील जोशीला दोषी ठरवले होते. जोशीचे 2014 मध्ये निधन झाले. पटेल आणि गुप्ता या दोघांच्या शिक्षेवर आज निकाल देताना न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्याच्या सुनावणीत 149 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. 451 कागदपत्रे या खटल्यात पुरावे म्हणून सादर करण्यात आली. याशिवाय तपास यंत्रणेने तीन वेळा पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.

Web Title: Life imprisonment for two in Ajmer blast case