'गायकवाडांची बंदी उठवल्यास कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होईल'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे खासदार रवींद्र गायकवाड यांनी विनाअट माफी मागितल्याशिवाय आणि विमान सुरक्षेसंदर्भातील सर्व नियम पालन करण्याची लेखी हमी दिल्याशिवाय त्यांच्यावर घातलेली हवाई वाहतूकीची बंदी हटवू नये, असे आवाहन ऑल इंडिया केबिन क्रू संघटनेने "एअर इंडिया'ला लिहिलेल्या पत्रात केले आहे.

नवी दिल्ली - 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे खासदार रवींद्र गायकवाड यांनी विनाअट माफी मागितल्याशिवाय आणि विमान सुरक्षेसंदर्भातील सर्व नियम पालन करण्याची लेखी हमी दिल्याशिवाय त्यांच्यावर घातलेली हवाई वाहतुकीची बंदी उठवू नये, असे आवाहन ऑल इंडिया कॅबिन क्रू संघटनेने 'एअर इंडिया'ला लिहिलेल्या पत्रात केले आहे.

ऑल इंडिया कॅबिन क्रू संघटनेचे सचिव संजय लझार यांनी "एअर इंडिया'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्‍विनी लोहानी यांना पत्र लिहिले आहे. "गायकवाड यांना हवाई प्रवासाची अनुमती देणे म्हणजे विमान, विमानातील कर्मचारी यांना धोका असल्याने त्यांना पुन्हा एकदा परवानगी देण्याबाबत सरकारने याबाबत गंभीरपणे दीर्घ विचार करावा', असे पत्रात म्हटले आहे. जर एअर इंडियाचे सर्व कर्मचारी आणि एका अर्थाने सर्व भारतीयांची माफी मागितल्याशिवाय गायकवाड यांना विमान प्रवासाची अनुमती दिली तर ते अत्यंत लज्जास्पद ठरेल. त्यामुळे विमान कर्मचाऱ्यांची मानसिक खच्चीकरण होईल, असेही पत्रात पुढे म्हटले आहे.

गायकवाड यांनी जर विनाअट माफी मागितल्याशिवाय आणि विमान वाहतुकीच्या पालन करण्याची लेखी हमी दिल्याशिवाय त्यांना विमान प्रवासाची अनुमती देण्यात येऊ नये, असे आवाहन पत्रात करण्यात आले आहे.