समाजाने वाळीत टाकल्याने इस्लाम धर्माचा स्वीकार

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

छत्तरपूर (मध्य प्रदेश): मुस्लिम महिलेशी विवाह केल्याने समाजाने घातलेल्या बहिष्काराची सल 28 वर्षे मनात ठेवत अखेर विनोद प्रकाश खरे (वय 51) यांनी इस्लाम धर्माला जवळ केले.

छत्तरपूर (मध्य प्रदेश): मुस्लिम महिलेशी विवाह केल्याने समाजाने घातलेल्या बहिष्काराची सल 28 वर्षे मनात ठेवत अखेर विनोद प्रकाश खरे (वय 51) यांनी इस्लाम धर्माला जवळ केले.

बुंदेलखंड जिल्ह्यातील राजनगरचे रहिवासी असलेले खरे यांनी 28 वर्षांपूवी मुस्लिम महिलेशी विवाह केला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने हिंदू नाव धारण केले. ""कुटुंबाने व नातेवाइकांनी आमच्या विवाहाला मान्यता दिली नाही. कुटुंब व समाजाने आम्हाला बहिष्कृत केले,'' अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या घटनेमुळे विवश होऊन खरे यांनी पत्नी व मुलांसह सोमवारी (ता. 21) इस्लाम धर्माचा स्वीकार केला. ""हिंदू समाजाने आम्हाला कधीच सहकार्य केले नाही. विवाह समारंभाप्रसंगीही आम्हाला कोणीही बोलाविले नाही. वडिलांच्या निधनानंतर अंत्ययात्रेत खांदा देण्यापासूनही मला रोखण्यात आले. अशा काळात मुस्लिम समाजाने आम्हाला खूप मदत केली,'' असे खरे यांनी सांगितले. धर्मांतरानंतर त्यांचे नामकरण गुलाम महंमद असे झाले आहे.

खरे कुटुंबाच्या धर्मांतराबाबत माहिती मिळाल्याचे राजनगरचे उपविभागीय न्यायदंडाधिकारी रवींद्र चौकसी यांनी सांगितले. त्यांच्यात काही वादविवाद असल्यास आवश्‍यक उपाय करण्यात येतील, असेही ते म्हणाले. खरे यांची कौटुंबिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे विश्‍व हिंदू परिषदेच्या स्थानिक नेत्याने स्पष्ट केले. ""आम्ही त्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत. त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न करीत आहोत. धर्मांतराच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे,'' असे या नेत्याने म्हटले आहे.