"मैत्रीचा वेग' कायम राखणार ; मोदी-जिनपिंग चर्चेतील निर्णय

Maintain friendship momentum China Defense Minister will soon be in India
Maintain friendship momentum China Defense Minister will soon be in India

जोहान्सबर्ग : भारत-चीनदरम्यान संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेला आलेला वेग कायम ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी घेतला आहे. यानुसार चीनचे संरक्षणमंत्री पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या "ब्रिक्‍स' परिषदेवेळी मोदी आणि जिनपिंग यांच्यात स्वतंत्रपणे चर्चा झाली. 

गेल्या तीन महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा या दोन नेत्यांची भेट होत आहे. या वेळी संबंध सुधारण्याचा वेग आपण कायम ठेवणे आवश्‍यक असून, त्यासाठी नियमित कालावधीने या संबंधाचे अवलोकन करून गरजेनुसार आपल्या पातळीवरून योग्य सूचना कराव्यात, असे मोदी यांनी जिनपिंग यांना सांगितले. गेल्या काही कालावधीमध्ये झालेल्या सलग भेटींमुळे भारत-चीन संबंध सुधारण्यास मोठी मदत झाल्याचेही मोदी म्हणाले. जिनपिंग यांनी मोदी यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवित, परस्पर विश्‍वास आणि सहकार्य वाढविण्यासाठी सर्व प्रकारे मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. 

दक्षिण आफ्रिकेबरोबर तीन करार 

पंतप्रधान मोदी आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सीरिल रॅमोफोसा यांच्यात आज प्रामुख्याने व्यापार, गुंतवणूक, माहिती तंत्रज्ञान आणि संरक्षण या मुद्यांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर दोन देशांदरम्यान शांततापूर्ण उद्देशांसाठी अवकाश संशोधन, कौशल्य विकासासाठी गांधी-मंडेला केंद्राची उभारणी आणि कृषी संशोधन याबाबत एकूण तीन करार करण्यात आले. 

अंगोला, अर्जेंटिनाशीही चर्चा 

"ब्रिक्‍स'च्या सदस्य देशांबरोबर चर्चा करण्याबरोबरच पंतप्रधान मोदी यांनी आज अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेन्सो आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष मॉरिशिओ मॅक्री यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. लॉरेन्सो यांच्याबरोबरील भेटीत व्यापार, गुंतवणूक, अन्नप्रक्रिया, औषधे, तेल आणि नैसर्गिक वायू या मुद्यांवर चर्चा झाली. भारत हा अंगालोचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश आहे. मॅक्री यांच्याबरोबरही मोदी यांनी कृषी आणि गुंतवणूक क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा केली. 

पुतीन यांची भेट फलदायी 

जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचीही भेट घेतली. या दोघांमध्ये विविध आंतरराष्ट्रीय आणि द्वीपक्षीय मुद्यांवर चर्चा झाली. रशियाबरोबरील मैत्री अत्यंत सखोल असून, पुतीन यांच्याबरोबर आज झालेली चर्चा फलदायी ठरल्याचे मोदी यांनी भेटीनंतर सांगितले. मोदी आणि पुतीन यांच्यातही गेल्या तीन महिन्यांमधील ही तिसरी भेट आहे. पुतीन यांच्याबरोबरील चर्चेदरम्यान प्रामुख्याने व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण आणि पर्यटन या क्षेत्रांबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com